Breaking News

विश्वविजेत्या Team India ला ‘या’ देशाकडून निमंत्रण! भारतासोबतचे संबंध जपण्यासाठी ‘क्रिकेट डिप्लोमासी’चा वापर

team India
Photo Courtesy: X/Suryakumar Yadav

Maldives Invited Team India: टी20 विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे (Indian Cricket Team) तीन आठवड्यानंतरही ठिकठिकाणी स्वागत सुरू आहे. अजूनही खेळाडूंचा सन्मान करण्यात येतोय. अशातच आता भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या मालदीवने भारतीय क्रिकेट संघाला आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले आहे (Maldives Invite Team india).

भारतीय क्रिकेट संघाने 29 जून रोजी बार्बाडोस येथे झालेल्या टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. त्यानंतर मायदेशात संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. आता मालदीवच्या पर्यटन विभाग व मालदीव पर्यटन उद्योग संघ यांनी संयुक्त विद्यमाने भारतीय संघाला आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले.

दोन्ही विभागांनी सार्वजनिक केलेल्या संयुक्त निमंत्रणात म्हटले आहे,
“आम्हाला या विश्वविजय संघाचे स्वागत करायला आवडेल. ही भेट कायमस्वरूपी आठवणी ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करू. भारत आणि मालदीवचे जुने सांस्कृतिक आणि क्रीडा संबंध वृद्धिंगत होतील. आम्ही त्या दिवसाची नक्कीच वाट पाहू. सर्व खेळाडूंना आनंद साजरा करण्यासाठी योग्य वातावरण येथे आहे.”

काही महिन्यांपूर्वीच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे मालदीवचे काही मंत्री अडचणीत आले होते. त्यानंतर भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पूर्णपणे पाठ फिरवली. याचा आर्थिक तोटा संपूर्ण देशाला सहन करावा लागला. त्यामुळे हे संबंध पुन्हा एकदा सुधारण्यासाठी मालदीव हा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता भारतीय संघ हे निमंत्रण स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. कारण, भारतीय संघ लवकरच श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होईल. तसेच, विश्वविजेत्या संघातील अनेक खेळाडू सध्या इतरत्र सुट्ट्या घालवत आहेत. त्यानंतर भारताला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळायच्या आहेत. तर वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.

(Maldives Invites Indian Cricket Team)