Breaking News

David Warner बद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला धक्कादायक निर्णय! 8 दिवसांपूर्वी वॉर्नर म्हणालेला…

David Warner
Photo Courtesy: X

Cricket Australia On David Warner: ऑस्ट्रेलियाचा महान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने मागील महिन्यात टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने आपण वनडे संघातील निवडीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटलेले. मात्र, आता या प्रकरणावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या निवड समितीचे महत्त्वाचे वक्तव्य आलेले आहेत.

मागील जवळपास 16 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या वॉर्नर याने मागील वर्षी वनडे विश्वचषकानंतर आपला हा अखेरचा वनडे विश्वचषक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर चालू वर्षाच्या सुरुवातीला त्याने कसोटीमधून निवृत्ती घेतली. टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले होते. या पराभवानंतर त्याने टी20 क्रिकेटला रामराम केलेला.

वॉर्नर याने 8 जुलै रोजी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, “निवड समिती विचार करत असेल तर, मी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी उपलब्ध असेल.” त्याच्या या वक्तव्यामुळे तो वनडे संघात पुनरागमन करू शकतो अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका निवड समिती सदस्याने या सर्व शक्यतांना केराची टोपली दाखवली आहे. आगामी चॅम्पियन ट्रॉफीसाठी वॉर्नर याच्या नावाचा विचार केला जाणार नाही, असे या सदस्याने स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे आता त्याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची सर्व दारे बंद झाल्याचे बोलले जातेय.

वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात उत्तम सलामीवीरांपैकी एक राहिला. त्याने आपल्या कारकिर्दीत दोन वनडे विश्वचषक, टी20 विश्वचषक व जागतिक कसोटी चॅम्पियनशिप या मानाच्या स्पर्धा जिंकण्याचा कारनामा केला. सध्या त्याच्या नावे केवळ चॅम्पियन्स ट्रॉफी ही एकमेव आयसीसीची स्पर्धा नाही. त्यामुळे या स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल अशी चर्चा सुरू होती.

(Australia Selector Confirms David Warner Will Not Part Of Champions Trophy 2025)