Breaking News

T20 World Cup 2024 Triumph: वर्षपूर्ती टीम इंडियाच्या विश्वविजयाची, न विसरता येणाऱ्या आठवणींची

T20 WORLD CUP 2024 TRIUMPH
Photo Courtesy: X

T20 World Cup 2024 Triumph: 29 जून 2024, भारतीय क्रिकेटमधील अशी तारीख जी कधीही कोणाच्या स्मरणातून जाणार नाही. तब्बल 17 वर्षांच्या टी20 विश्वचषकाचा आणि 11 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा मोठा दुष्काळ संपवून भारताने टी20 वर्ल्डकप उंचावला,‌ ती हीच तारीख. आज या विश्वविजयाला वर्षपूर्ती होतेय (One Year Of T20 World Cup 2024 Triumph). त्याचीच ही एक आठवण.

One Year Of T20 World Cup 2024 Triumph

युवा एमएस धोनीच्या यंगिस्तानने 2007 चा टी20 वर्ल्ड कप जिंकला आणि भारतात दिवाळी साजरी झाली. त्यानंतर वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफीही भारतात आलेली. इंग्लंडमध्ये 2013 मध्ये जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीयांच्या पदरी फक्त पडत होती ती निराशा. तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून तब्बल पाच फायनल टीम इंडियाने गमावल्या होत्या. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाकडून पुन्हा एकदा देशवासियांना अपेक्षा होती. मात्र, तितकीच धाकधूकही.

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हापासूनच अनेक चर्चा सुरू झालेल्या. संघात अनेक सीनियर खेळाडू होते आणि आयपीएल गाजवणाऱ्या काही खेळाडूंना स्थान मिळाले नव्हते. त्यात राहुल द्रविड हे कोच म्हणून शेवटचे दिसणार हे निश्चित असल्याने थोडीशी भावनिक किनारही लाभलेली. आयपीएलमुळे भारतीय संघ दोन टप्प्यात अमेरिकेत पोहचला. सराव आणि सगळी तयारी करून भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये उतरण्यास सज्ज झाला. (Latest Cricket News)

भारताचा वर्ल्डकप ओपनर होता आयर्लंडविरुद्ध. दुबळ्या आयर्लंडला भारताच्या पेस बॅटरीने अवघ्या 96 धावांवर ऑल-आउट केले. त्यानंतर कॅप्टन रोहितने तुफानी 52 आणि रिषभ पंतने नाबाद 36 रन्स करून टीम इंडियाला सोपा विजय मिळवून दिला. टीम इंडियाने सुरुवात तर दणक्यात केली.

रोहित सेने समोर पुढचा पेपर होता कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा. न्यूयॉर्कच्या नसाऊ काऊंटी या टेम्पररी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताच्या गोलंदाजीची दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळाली. गोलंदाजांचे नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर पंत सोडला तर कोणीही टिकू शकले नाही. त्यामुळे, टीम इंडिया फक्त 119 धावांपर्यंत पोहोचू शकली. सगळ्यांनी पाकिस्तानच्या सहज विजयाची औपचारिकता बाकी असल्याचे म्हटलेले. मात्र, भारताच्या सगळ्याच गोलंदाजांनी आपला क्लास दाखवला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने केवळ 14 धावा देत 3 बळी घेऊन पाकिस्तानला 6 धावा आधीच रोखत एक अविस्मरणीय विजय भारताच्या पदरात टाकला. (Team India’s T20 World Cup 2024 Triumph)

युएसएविरूद्धचा शेवटचा सामना खऱ्या अर्थाने टीम इंडियाला जड गेला. घरच्या मैदानावर खेळण्याचे एडवांटेज दुबळ्या वाटत असलेल्या, तरी नसलेल्या अमेरिकेने घेतले. पाकिस्तानला हरवून त्यांनी आधीच खळबळ उडवून दिली होती. भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजी पुढे ते फक्त 110 धावा करू शकले. मात्र, मूळचा भारतीय असलेल्या सौरभ नेत्रावळकर याने भारतीयांच्याच हृदयाची धडधड वाढवली. रोहित आणि विराटची ड्रीम विकेट त्याने काढली. रिषभ पंतही स्वस्तात माघारी गेला. अमेरिका आणखी एक उलटफेर करणार असे वाटत होते. परंतु, टी20 स्पेशालिस्ट असलेल्या सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी अगदी 100 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करून शेवटी टीम इंडियाला विजय मिळवून दिलाच. त्याचबरोबर टीम इंडियाची सुपर 8 मध्ये एन्ट्री देखील थाटात झाली. कॅनडाविरुद्धचा शेवटचा सामना पावसामुळे झालाच नाही. मात्र, त्याचा टीम इंडियाच्या अव्वल स्थानावर काहीही परिणाम झाला नव्हता.

टीम इंडियाला सुपर 8 मध्ये तसे तगडे आव्हान मिळालेच नाही. अफगाणिस्तान आणि बांगलादेशने सपशेल नांग्या टाकल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितने 19/11 चा बदला घ्यायच्या इराद्याने बॅटिंग केली आणि आपल्या टी20 करिअरमधील सर्वात यादगार 92 रन्सची इनिंग खेळली. नाही म्हणायला ट्रेविस हेड आणि कॅप्टन मार्श यांनी संघर्ष केला. मात्र, अक्षर पटेलच्या त्या ‘वर्ल्डकप डिफाइनिंग’ कॅचने ऑस्ट्रेलियाला सामन्यात मागे खेचले. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवत सेमी फायनल गाठली. वर्ल्डकप एक पाऊल जवळ आलेला.

(Team India’s T20 World Cup 2024 Triumph)

सेमी-फायनलमध्ये समोर उभी होती गतविजेती आणि मागच्या टी20 वर्ल्डकप सेमी-फायनलमध्ये टीम इंडियाला हरवणारी इंग्लंड. आधीच ठरल्याप्रमाणे टीम इंडिया गयानातच आपला सेमी-फायनल सामना खेळणार होती. यावर मोठे वादंगही उठलेले. असो. कॅप्टन रोहितने पुन्हा एकदा चार्ज घेतला आणि कडक फिफ्टी मारली. सूर्यानेही योगदान दिले.‌ भारताने उभ्या केल्या 171 धावा. गयानाच्या त्या फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर अक्षर आणि कुलदीप समोर इंग्लंडने लोटांगण घातले. कसेबसे 103 पर्यंत जाऊन इंग्लंडने दम तोडला आणि भारत फायनलमध्ये पोहोचला.

तब्बल 10 वर्षानंतर टी20 वर्ल्ड कप फायनल आणि 17 वर्षानंतर वर्ल्डकप जिंकण्याची संधी. समोर उभी दक्षिण आफ्रिका 1998 नंतर पहिल्यांदाच एखाद्या आयसीसी ट्रॉफीच्या शोधात उभी होती. तसं पाहायला गेलं तर ट्रॉफी दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वाची. बार्बाडोसच्या केनिंग्टन ओव्हलवर ट्रॉफी उंचावून कोणीतरी इतिहास घडवणार हे नक्की होतं.

फायनलआधी रिषभ पंतला बसवून संजू सॅमसनला संधी द्यायचा विचार टीम मॅनेजमेंट करत होती. मात्र, अखेरच्या क्षणी हा प्लॅन कॅन्सल झाला आणि रिषभच संघात राहिला. रोहितने टॉस जिंकला आणि पहिली बॅटिंग घेतली. ब्रिजटाऊनच्या त्या ‘क्रेझी’ वातावरणात सामना सुरू झाला. भारतीयांना नकोशी अशी ती सुरुवात होती. रोहित अवघ्या 9, पंत शून्य आणि सूर्या 3 धावांवर माघारी गेले. भारत 3 बाद 34. सगळीकडे शांतता पसरली होती.

या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे विराटने जान्सेनला चार फोर मारत आपला टच दाखवला होता. दुसरीकडे टीम मॅनेजमेंटने मोठी रिस्क घेत अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर पाठवले. थोड्या चाचपडत खेळणाऱ्या विराटला अक्षरने मोकळीक दिली. त्याने दुसऱ्या बाजूने प्रतिहल्ला चढवला. दोघांनी बघता बघता 72 धावांची पार्टनरशिप केली ती देखील फक्त 54 चेंडूत. एका चुकीच्या कॉलचा फटका टीम इंडियाला बसला आणि अक्षर रन आऊट झाला. अक्षर पव्हेलियनमध्ये जात असताना त्याच्या नावापुढे 47 धावा होत्या आणि त्या देखील केवळ 31 चेंडूंमध्ये. भारतासाठी टी20 इतिहासातील एक असामान्य आणि मौल्यवान खेळी त्याने केली होती.

अक्षर गेल्यावर आलेल्या शिवम दुबेने अजिबात वेळ घालवला नाही. त्याने 16 चेंडूत 27 धावांचा तडाखा दिला. बराच वेळ सावध खेळत असलेल्या विराटने गिअर बदलले. आपल्या अर्धशतकानंतर अचानक त्याने मोठे फटके खेळत भराभर धावसंख्या वाढवली. बाद होऊन जाताना त्याने 59 चेंडूंवर 76 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने 176 अशी मजबूत धावसंख्या धावफलकावर लावली होती.

(Story Of Team India’s T20 World Cup 2024 Triumph)

दोन पैकी एका देशाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपण्यासाठी आता केवळ 20 ओव्हर बाकी होत्या. जसप्रीत बुमराहने रिझा हेंड्रिक्सची दांडी दुसऱ्या ओव्हरमध्येच उडवली. पुढच्या ओव्हरमध्ये अर्शदीपने भरवशाच्या मार्करमला बाहेरची वाट दाखवली. टीम इंडिया आणि भारतीय चाहते यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. वर्ल्डकप अगदी टप्प्यात दिसत होता. मात्र, डी कॉक आणि स्टब्स या जोडीचा विचार वेगळाच काहीतरी होता.

दोघांनी भारतीय गोलंदाजांवर अचानक आक्रमण केले आणि दक्षिण आफ्रिका इतक्या लवकर सामन्यातून बाहेर पडणार नाही याची खबरदारी घेतली. दोघांनी 58 धावांची भागीदारी केली ती देखील फक्त 38 चेंडूंमध्ये. दबाव हळूहळू भारतीय संघावर येऊ लागला. अक्षरच्या गोलंदाजीवर स्टब्स एक खराब फटका खेळून बाद झाला. मात्र, त्यानंतर आलेल्या क्लासेनने भारतीयांना आनंद साजरा करण्याची संधी दिली नाही. त्याने डी कॉकला सोबत घेत आणखी 35 धावा लावत संघाला शंभरी पार करून दिली.

डी कॉक वेगाने अर्धशतकाकडे जात असताना 13 व्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर कुलदीपकडे झेल देऊन बाद झाला. भारतीय संघासाठी येथे सामन्यात पुनरागमन करण्याची संधी होती. मात्र, काहीतरी वेगळ्याच फॉर्ममध्ये असलेल्या क्लासेनने 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचा इरादा केला होता. सर्वात अनुभवी मिलर त्याच्या जोडीला आलेला.

अशात 15 वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला अक्षर पटेल. अक्षरसाठी आत्तापर्यंत वर्ल्डकप आठवणीत राहणारा ठरलेला. बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही विभागात त्याने आपले भरीव योगदान दिलेले. इथे तो क्लासेनच्या कचाट्यात सापडला आणि क्लासेनने त्याच्या ओव्हरमध्ये 24 धावांची लयलूट केली. 14 ओव्हरनंतर 123 असणारी धावसंख्या झटक्यात 147 झालेली. दक्षिण आफ्रिकेपुढे आव्हान शिल्लक होते फक्त 30 चेंडू 30 धावा.

रोहितने ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत चेंडू बुमराहच्या हाती दिला. इथे मिलर-क्लासेनने आपला अनुभव दाखवला आणि त्या ओव्हर मध्ये रिस्क न घेता फक्त चार धावा काढल्या. क्लासेनने फिफ्टी पूर्ण केली. भारतीय चेहरे मायूस दिसत होते. खेळाडूंचे खांदे पडलेले. वर्ल्डकपसाठी आणखी वाट पाहायला लागणार, अशी शक्यता निर्माण झालेली.

अशात रिषभ पंतने डोके लावले. क्लासेन-मिलर यांना मोमेंटम मिळालाय आणि ते असेच मारत राहणार, याची त्याला खात्री होती. हाच मोमेंटम तोडण्यासाठी त्याने पाय दुखण्याचे नाटक केले आणि वेळ खाल्ला. क्लासेन सामना सुरू करण्यासाठी पंचांना सांगत होता. अखेर सामना सुरू झाला आणि जे व्हायचे तेच झाले. हार्दिक पंड्या टाकत असलेल्या त्या ओव्हरच्या पहिल्याच अगदी साध्या लेंथ बॉलवर क्लासेन फसला आणि पंतच्या हातात झेल देऊन बास झाला. पंतचा प्लॅन यशस्वी झालेला.

(Story Of T20 World Cup 2024 Triumph)

क्लासेन बाद होताच भारतीय संघ आणि मैदानातील भारतीय पाठीराखे यांच्यात अक्षरशः वीज संचारली. हार्दिकच्या त्या ओव्हरमध्ये देखील फक्त चार धावा गेल्या. दक्षिण आफ्रिकेसमोर आता 18 चेंडूंमध्ये 22 धावांचे लक्ष होते. मात्र, पुढची ओव्हर होती संपूर्ण वर्ल्डकप आपल्या गोलंदाजीने गाजवणाऱ्या बुमराहची. वर्ल्डकपची ही स्वतःची शेवटची ओव्हर त्याने आपल्या करिअरची शेवटची ओव्हर असल्यासारखी टाकली. फक्त दोन रन देत जान्सेनचा अफलातून इनस्विंगवर बोल्ड उडवला. दक्षिण आफ्रिका चोक करायला सुरू झालेली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

मॅच 30 बॉल 30 वरून 12 बॉल 20 वर आली. बुमराह आणि हार्दिकने केलेले कष्ट अर्शदीपने वाया जाऊ दिले नाहीत आणि 19 व्या ओव्हरमध्येही फक्त 4 रन्स दिल्या. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये हव्या होत्या 16 रन्स. दक्षिण आफ्रिकेसाठी हे सर्व समजण्यापलीकडचे होते. दक्षिण आफ्रिकेची शेवटची आशा होती डेव्हिड मिलर. मिलर हाच भारत आणि वर्ल्डकप यांच्या दरम्यान उभा राहिलेला. भारताकडून शेवटच्या ओव्हरची जबाबदारी आली पुन्हा एकदा हार्दिक पंड्यावर.

सगळी फील्डिंग लावून हार्दिक पहिला चेंडू टाकण्यासाठी धावला. वाईड लाईनवर फुलटॉस गेलेल्या या चेंडूवर मिलरने मोठा फटका मारला. प्रथमदर्शनी चेंडू षटकार जाईल असे वाटत होते. मात्र, लॉंग ऑफला असलेल्या सूर्यकुमार यादव याने जीवाची बाजी लावावी तसा प्रयत्न केला आणि हा झेल पूर्ण केला. हिंदी कॉमेंट्रीमध्ये जतिन सप्रू याने ” लॉंग ऑफ.. लॉंग ऑफ.. लॉंग ऑफsss” असं म्हणत या झेलाला कायमस्वरूपी अजरामर केले. भारत वर्ल्डकप जिंकण्याची केवळ औपचारिकता बाकी राहिलेली. रबाडाने पुढच्या बॉलवर एक चौकार मारला पण तो संघाला अंतिम रेषे पार घेऊन जाऊ शकला नाही. पाचव्या चेंडूवर रबाडा बाद झाला आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव निघताच भारत विश्वविजेता बनला.

विश्वविजय झालाय या वास्तविकतेत रोहित मैदानावर हात मारत होता, हार्दिकने मागच्या काही महिन्यात जे सोसलं होतं ते त्याच्या डोळ्यातून बाहेर येत होतं, विराट आनंदाश्रू लपवत नव्हता आणि इतर सगळेच विश्वविजेत्याच्या अविर्भावात आपला आनंद साजरा करत होतो. अर्शदीप-सिराजचा भांगडा थांबत नव्हता. एक पिढी, एका तपानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा आनंद साजरा करण्याची संधी मिळाली होती.

राहुल द्रविडने वर्ल्डकप ट्रॉफी हातात घेतल्यानंतर केलेला जल्लोष त्याच्यासाठी या वर्ल्डकपच असलेलं महत्त्व अधोरेखित होत होते. वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावून रोहित, विराट आणि जडेजा या अनुभवी त्रिमूर्तीने आंतरराष्ट्रीय टी20 मधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च बिंदूवर थांबत असल्याचे समाधान त्यांच्या डोळ्यात होतं. फेब्रुवारी महिन्यात कर्णधार रोहित आणि तत्कालीन बीसीसीआय सेक्रेटरी जय शहा यांनी देशवासीयांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं होतं. रोहितने ‘लेहरा दो’ म्हणत बार्बाडोसच्या भूमीवर भारताचा तिरंगा रोवला होता.

(One Year Of Team India’s T20 World Cup 2024 Triumph)

विश्वविजेता भारत! टीम इंडियाने उंचावली T20 World Cup 2024 ची ट्रॉफी, रोहित-विराटचे स्वप्न साकार