
PAKvBAN Rawalpindi Test: पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK v BAN) यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी (Rawalpindi Test) येथे खेळला गेला. पाचव्या दिवसापर्यंत गेलेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाकिस्तानला 10 गडी राखून पराभूत करत त्यांनी मालिकेत आघाडी घेतली.
History for Bangladesh 👏
The Tigers record their first-ever victory over Pakistan in Test cricket!#WTC25 | 📝 #PAKvBAN: https://t.co/gx5zGEHGIi pic.twitter.com/uJvT44rZEB
— ICC (@ICC) August 25, 2024
रावळपिंडी येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सौद शकिलच्या 141 व मोहम्मद रिझवानच्या नाबाद 171 धावांच्या जोरावर त्यांनी 448 धावा उभारल्या. विशेष म्हणजे त्यांनी केवळ सहा गडी बाद झाले असताना आपला डाव देखील घोषित केलेला.
यानंतर बांगलादेश संघासाठी सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांनी पहिल्या डावात आपले पाच बळी केवळ 218 धावांमध्ये गमावले होते. त्यानंतर मेहदी हसन मिराज व मुशाफिकूर रहीम यांनी जबरदस्त फलंदाजी करत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. रहीम याने दमदार 191 धावांची खेळी केली. त्या व्यतिरिक्त आणखी चार फलंदाजांनी अर्धशतके पूर्ण केली. या उत्कृष्ट फलंदाजामुळे बांगलादेशला 117 धावांची मजबूत आघाडी मिळाली.
सामन्याच्या अखेरच्या दिवशी पाकिस्तान संघ मोठी धावसंख्या उभारून सामना बरोबरीत सोडवेल अशी अपेक्षा होती. मात्र, मेहदी हसन मिराज याने चार व अनुभवी शाकीब अल हसन याने तीन बळी मिळवत, पाकिस्तानचा डाव केवळ 146 धावांमध्ये संपवला. विजयासाठी मिळालेल्या 30 धावांचे आव्हान बांगलादेशने बिनबाद पार केले.
पाकिस्तानला कसोटी क्रिकेटमध्ये पराभूत करण्याची ही बांगलादेशची पहिलीच वेळ आहे. यासोबतच पाकिस्तान संघ मागील 1,293 दिवसांपासून मायदेशात कसोटी सामना जिंकू शकला नाही. यादरम्यान त्यांनी नऊ कसोटी सामने खेळले आहेत.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
(Bangladesh Beat Pakistan In Rawalpindi Test By 10 Wickets)