Breaking News

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?

PARIS OLYMPICS 2024
Photo Courtesy: X/ASI

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्ससाठी क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील तिसरी दावेदार आहे, महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain). आपल्या दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये दुसरे मेडल मिळवण्यासाठी लवलिनाने ग्लोव्हज टाईट केले आहेत. तिचीच ही गोष्ट.

Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024

लवलिना बोर्गोहेन हे नाव भारतीयांना टोकियो ऑलिंपिकनंतर (Tokiyo Olympics 2024) समजले. मात्र, आसामच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास किती कष्ट आणि मेहनतीने तिने पार केला होता, याची कल्पना बऱ्याच जणांना नसेल. लवलिनाचे वडील टिकेन हे आसामच्या गोलाघाट येथे एक छोटेसे दुकान चालवायचे. त्यांचे पूर्ण कुटुंब बारोमुखिया येथे राहायचे. त्यांना तीन मुली होत्या. कुस्तीपटू फोगट बहिणीच्या आई-वडिलांना जसे लोक मुलगा नसल्याने टोमणे मारायचे, तशीच परिस्थिती इथे देखील होती. मात्र, आई ममोनी तिन्ही मुलींना एकच गोष्ट सांगायची की, अस काही करून दाखवा की लोकांनी तुम्हाला कायम लक्षात ठेवायला हवं.

लवलिना लहान असताना एकदा तिचे वडील मिठाई घेऊन आले होते. त्याच कागदावर होती महान बॉक्सर मोहम्मद अली (Mohmmad Ali) यांची स्टोरी. वडिलांनी ती स्टोरी लवलिनाला वाचून दाखवली. इथेच तिच्या बॉक्सिंग (Boxing) प्रेमाची सुरुवात झाली. तसं पाहायला गेलं तर बोर्गोहेन यांच्या घरात खेळ नवा नव्हता. मोठ्या मुली लिची आणि लिमा किक-बॉक्सिंग करायचा. पुढे जाऊन दोघींनी राष्ट्रीय पातळीवर मेडल देखील जिंकली. लवलिनाही मार्शल आर्ट शिकत होती. मात्र, तिला आता बॉक्सिंगचे आकर्षण वाटू लागले होते.

लवलिना नववीत शिकत असताना बारपठार गर्ल्स स्कूल येथे साईच्या ट्रायल्स आयोजित केल्या गेल्या होत्या. तिथे बॉक्सिंग करणाऱ्या लवलिनावर कोच पदुम चंद्र बोडो यांची नजर पडली. तिचा खेळ पाहून त्यांनी तिची निवड केली. आता लवलीना गुवाहाटी येथील साई सेंटरवर सराव करू लागली होती. संध्या गुरुंग या तीला मार्गदर्शन करत. लवलिनावर एक वेळ अशी आली होती की, तिच्याकडे ट्रॅकसूटसाठी देखील पैसे नव्हते.

सुरुवातीला घाबरून घाबरून खेळणाऱ्या लवलिनाने पुढे जाऊन आक्रमक बॉक्सिंग करायला सुरुवात केली. ती सातत्याने मेहनत घेत होती. राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा तिने जिंकल्या. काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील तिने मेडल मिळवले होते. मात्र, तिला खरी ओळख मिळाली 2018 मध्ये. त्यावर्षी दिल्ली येथे झालेल्या वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने ब्रॉंझ आपल्या नावे केले. या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी देखील तिने मेडल आपल्या नावे केले.

संपूर्ण जग कोविडच्या लपेट्यात येण्याच्या काही दिवस आधीच लवलिनाने टोकियो ऑलिंपिक्सचे तिकीट पक्के केले होते. ऑलिंपिक्ससाठी पात्र होणारी ती आसामची केवळ दुसरी खेळाडू आणि पहिली महिला होती. तयारी झालेली असताना ऑलिंपिक्स होऊ शकले नाही. परिणामी, सराव देखील काहीसा कमी झालेला. अनेकदा सराव करण्याची इच्छा असतानाही साई सेंटरवरून तिला माघारी पाठवण्यात आले होते.

Paris Olympics 2024:‌ ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| गोष्ट फुलराणी पीव्ही सिंधूची! देशाला आशा मेडल हॅट्रिकची

कोणी कितीही अडथळे आणले तरी, जे मिळवण्यासाठी मेहनत घेतलेली असते, ती गोष्ट मिळून जाते असे म्हणतात. ही गोष्ट लवलिनाच्या बाबतीत खरी ठरली.‌ टोकियोमध्ये भारतीय पथक शानदार कामगिरी करत असताना लवलिना हिने देखील दोन विजय मिळवून मेडल निश्चित केले. पुढे सेमीजमध्ये तिला वर्ल्ड नंबर वन बॉक्सरकडून पराभूत व्हावे लागले. तरीदेखील तिने इतिहास रचला होता. आपली आदर्श मेरी कॉम हिच्याप्रमाणे ती देखील ऑलिंपिक्स ब्रॉंझ मेडलिस्ट बनली होती. त्या दिवसापासून संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला लवलिना बोर्गोहेन हे नाव समजले.

ती स्वतः म्हणते की, या मेडलनंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. आधी लोकांना फरक पडत नसत की, मी जिंकते आहे की हरते आहे. मात्र, आता लोक आमच्या देखील मॅच पाहतात. त्याच वर्षी तिला भारत सरकारकडून खेलरत्न पुरस्कार देखील देण्यात आला. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तिच्या गावात आणि घरापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आसाम सरकारने बनवून दिला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

जगभरात देशाचे नाव उंचावणाऱ्या लवलिनाने 2022 बर्मिंगहॅम कॉमनवेल्थआधी एक सोशल मीडिया पोस्ट करत भारतीय क्रीडा क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. आपल्या प्रशिक्षकांना ट्रेनिंग सेंटरवर येऊ दिले जात नाही व माझा मानसिक छळ केला जातो असे आरोप तिने लावले होते. याच संपूर्ण घडामोडींमुळे ती स्पर्धेत पदक जिंकू शकली नाही. सगळी परिस्थिती ठीक झाल्यानंतर तिने 2023 वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकत आपण पॅरिस ऑलिंपिकसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले.

यंदा लवलिना 75 किलोग्राम वजनी गटात आपले आव्हान सादर करेल. सध्या वर्ल्ड चॅम्पियन असल्याने तिच्याकडे गोल्ड मेडल ची दावेदार म्हणून पाहिले जातेय. संपूर्ण देशाच्या अपेक्षा असताना ती जोरदार पंच मारत, भारताची पहिली ऑलिंपिक्स गोल्डन गर्ल बनते का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Lovlina Borgohain)