Rashid Khan – Suryakumar Yadav : बार्बाडोसच्या मैदानावर अफगाणिस्तानिविरुद्ध (IND vs AFG) झालेला सुपर ८ सामना भारतीय संघाने ४७ धावांनी जिंकला. या सामन्याचा खरा नायक राहिला मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar Yadav). सूर्यकुमारने वरच्या फळीतील महत्त्वपूर्ण फलंदाजांच्या विकेट पडल्यानंतर मधल्या फळीत आक्रमक अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमारला त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यादरम्यान असा एक प्रसंग आला, जिथे सूर्यकुमारच्या फटक्यांना घाबरुन अफगाणिस्तानचा गोलंदाज राशीद खान (Rashid Khan) याने त्याच्याकडे फलंदाजीत नमते घेण्याची विनंती केली.
त्याचे झाले असे की, सूर्या फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. अफगाणिस्तानचा कर्णधार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खानने पंतला पायचीत केल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. मग सूर्यकुमार क्रीझवर फलंदाजीसाठी आला. सूर्याने राशीदच्या चेंडूवर काही स्वीप शॉट्स मारून मोठ्या धावा जमवल्या. सूर्यकुमारने राशीदविरुद्ध २ चौकार आणि १ षटकार ठोकला. त्यामुळे राशीद सूर्यकुमारकडे आला आणि गंमतीने त्याला म्हणाला की, “माझ्यावर दया कर, चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न करू नको.”
सूर्यकुमार आणि राशीदमधील या संभाषणाचा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
दरम्यान या सामन्यात सूर्यकुमारने २८ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली. याशिवाय हार्दिक पांड्याने २४ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. तर विराट कोहलीने २४ धावांची तर रिषभ पंतने २० धावांची खेळी खेळली.