Shubman Gill : झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात (India vs Zimbabwe) भारतीय संघाने 23 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताकडून प्रभारी कर्णधार शुबमन गिलने शानदार अर्धशतक (SHubman Gill Half Century) झळकावले. या अर्धशतकी खेळीसह त्याने संघाच्या विजयात योगदान तर दिलेच, सोबतच मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शुबमन गिलने 49 चेंडूत 66 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 3 षटकार आणि 7 खणखणीत चौकारही मारले. हे कर्णधार म्हणून गिलचे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच अर्धशतक होते. यासह झिम्बाब्वेविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून अर्धशतक झळकावणारा गिल हा दुसरा भारतीय ठरला. त्याच्या आधी सुरेश रैनाने 2010 मध्ये हरारे येथे ही कामगिरी केली होती.
झिम्बाब्वेविरुद्ध टी20त अर्धशतक झळकावणारा भारतीय कर्णधार
हरारे, 2010- सुरेश रैना
हरारे 2024- शुबमन गिल
याव्यतिरिक्त गिल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात कर्णधार म्हणून पहिलं अर्धशतक करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने हे अर्धशतक केले तेव्हा त्याचे वय 24 वर्षे 306 दिवस होते. त्याने या विक्रमात विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराटने 2017 साली टी20 क्रिकेटमध्ये 28 वर्षे 305 दिवसांचा असताना कर्णधार म्हणून पहिले अर्धशतक केले होते. सुरेश रैना या यादीत अव्वलस्थानी असून त्याने 23 वर्षे 168 दिवसांचा असताना 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ही कामगिरी केली होती.