Breaking News

SL vs IND: कॅप्टन बनताच सूर्या तळपला! श्रीलंकन गोलंदाजी फोडत टीम इंडियाने उभारल्या 213 धावा

SL VS IND
Photo Courtesy: X

Suryakumar Yadav Fifty In SL vs IND: श्रीलंका आणि भारत (SL vs IND) यांच्यातील पहिला टी20 सामना पल्लेकले येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. या सामन्यातून टी20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने जोरदार फटकेबाजी करत, कर्णधार म्हणून शानदार सुरुवात केली.

तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय यशस्वी जयस्वाल व शुबमन गिल यांनी चुकीचा ठरवला. या सलामी जोडीने केवळ सहा षटकात 74 धावांची वेगवान सलामी दिली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्याने श्रीलंकन गोलंदाजांवर हल्ला चढवला.

सुरुवातीपासूनच त्याने मोठे फटके खेळत श्रीलंकन गोलंदाजांवर दबाव वाढवला होता. त्याने केवळ 23 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 26 चेंडूंमध्ये 58 धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

सूर्यकुमार यादव याने यापूर्वी देखील भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता तो टी20 संघाचा नियमित कर्णधार बनला आहे.  दोन वर्षांनी भारतात होणाऱ्या टी20 विश्वचषकात तोच संघाचा कर्णधार असू शकतो.

या सामन्यात भारतीय संघासाठी यशस्वी जयस्वाल याने 21 चेंडूंमध्ये 40 धावांची खेळी केली. तर, उपकर्णधार शुबमन गिल याने 16 चेंबूरमध्ये 34 धावा केल्या. रिषभ पंत याने 49 भावांचे योगदान दिले. या सर्व फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 213 धावांचा टप्पा पार केला. श्रीलंकेसाठी मथिशा पथिराना याने सर्वाधिक चार बळी मिळवले.

(SL vs IND Suryakumar Yadav Fifty Helps India To Post 213)