
Padmakar Shivalkar Demise: काल पद्माकर शिवलकर (Padmakar Shivalkar) गेले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, काहींनी पद्माकर शिवलकर कोण होते? असा प्रश्न देखील केला. अगदीच खरं बोलायचं झालं तर, पद्माकर शिवलकर हे नाव नव्या क्रिकेटप्रेमींना माहितही नसेल. याच मुख्य कारण म्हणजे ते ना कधी भारतासाठी खेळले, ना ते कोच होते, ना ते आज प्रत्येक रिटायर क्रिकेटपटू करतो तशी कॉमेंट्री करत… फक्त डोमेस्टिक क्रिकेट खेळून अफाट लोकप्रियता मिळवणाऱ्या पद्माकर शिवलकर (Story Of Padmakar Shivalkar) यांचा जीवनप्रवास एकदम अविस्मरणीय आणि जाणून घेण्यासारखा राहिला आहे.
Story Of Former Cricketer Padmakar Shivalkar
भारतीय क्रिकेटचा जन्म म्हणता येईल तो मुंबईचाच. भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईचे योगदान इतर कोणत्याही राज्यांपेक्षा काकणभर जास्तच. अगदी सुरुवातीच्या काळातील मर्चंट, हजारे असो नाहीतर आत्ताचे रोहित-जयस्वाल असोत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव लिहिले गेलेले गावसकर, वेंगसरकर, तेंडुलकर हे सारे मुंबईचेच. त्यावेळी असं मानलं जायचं की, तुम्ही भारतीय संघासाठी खेळणं जितका प्रतिष्ठेचे आहे, तितकीच प्रतिष्ठा मुंबईच्या रणजी संघात खेळल्याने भेटते.
https://twitter.com/VVSLaxman281/status/1896592722179539038
अशी आधीच हवा असलेल्या मुंबईच्या संघात एन्ट्री झाली पद्माकर शिवलकर यांची… उंचपुरे मात्र किरकोळ शरीरयष्टीचे शिवलकर डाव्या हाताचे स्पिनर. तीन पावलाचा रनअप आणि कोणताही पॉज किंवा विचित्र ॲक्शन न करता एकदम सरळ हातातून सुटणारा बॉल. त्या एकदम सरळ वाटणाऱ्या बॉलमध्ये इतके व्हेरिएशन असायचे की भलेभले बॅटर गांगारून जायचे. बॉल कधी स्पिन होईल, कधी उसळी घेईल, कधी सरळ राहिल हे काहीही सांगता येत नव्हते. समोरच्या संघाला हळूहळू नेस्तनाबूत करण्याच्या शिवरकरांच्या कौशल्यामुळे त्यांना क्रिकेटवर्तुळात ‘स्लो डेथ पॉयझन’ नावाने ओळखले जायचे. बाकी मित्रांसाठी ते पॅडीच होते.
प्रतिभा इतकी ठासून भरलेल्या शिवलकरांचा क्रिकेट प्रवासही खरंतर अचानक सुरू झालेला… जसं बालपण सरलं आणि तरुणपणात त्यांनी प्रवेश केला, तसे घरचे त्यांना नोकरी विषयी विचारू लागले. अनेक मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना सांगून, शिवलकर स्वतःही नोकरी शोधत होते. एकेदिवशी एका मित्राने विचारले, क्रिकेट खेळता येत का तुला? क्रिकेट खेळता येत असेल तर मिळेल नोकरी. शिवलकरांचा जन्म मुंबईचाच असल्याने क्रिकेट न येण्याचा प्रश्नच नव्हता. कांगा लीगमध्ये अनेक मिल्सचे संघ खेळायचे. त्यापैकी एक असलेल्या ब्रॅंडबरी मिलच्या नेमक्या ट्रायल्स सुरू झाल्या होत्या. एका मित्राचे क्रिकेट किट घालून शिवलकर ट्रायल द्यायला गेले.
पहिले दोन बॉल बॅटरला समजले नाहीत आणि तिसरा बॉल सरळ स्टंम्पवर लागून बॅटर क्लिन बोल्ड. शिवलकर अशीच बॉलिंग करत राहिले. मात्र, त्यांना माहित नव्हते की, विनू मंकड तिथेच उपस्थित आहेत आणि ते त्यांची बॉलिंग पाहत आहेत. मंकड तेव्हा भारतीय टॉप ऑलराऊंडर होते. त्यांनी शिवलकरांच्या जॉब आणि संघातील जागेवर शिक्कामोर्तब केले. मंकड यांनी काही मिनिटात हा हिरा पारखला होता.
ब्रॅंडबरी मिल्सच्या नेटपासून शिवलकर आधी शिवाजी पार्क जिमखाना आणि नंतर सीसीआयपर्यंत पोहोचले. सीसीआय म्हणजे क्रिकेट क्लब ऑफ इंडियात भारतीय क्रिकेटमधील मोठ्या नावांचा राबता असायचा. असं म्हणतात त्यावेळी टीम इंडियाचा रस्ता व्हाया सीसीआय जायचा. भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर शिवलकर सराव करायचे. जोडीला कोणी असो नसो, स्टंप ठोकून त्यांची प्रॅक्टिस सुरू असायची. अशात एकदा सीसीआय ऑस्ट्रेलिया टूरवर गेली. संघाचे प्रमुख स्पिनर होते पद्माकर शिवलकर. ऑस्ट्रेलियाच्या पिचेसवर त्यांनी तिथल्या बॅटर्सला लेझीम खेळायला लावली. शिवलकर लवकरच मुंबईसाठी खेळणार अशी चर्चा सुरू झाली. (Padmakar Shivalkar In Mumbai Ranji Team)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
मात्र, असं होणार नव्हते. कारण, शिवलकरांना वाट पाहायची होती. त्यांच्या नशिबी तेच होतं कदाचित. त्यावेळी मुंबईच्या स्पिन डिपार्टमेंटचे सर्वेसर्वा होते ‘द बापू नाडकर्णी. त्यामुळे बापू उपलब्ध असताना दुसरा स्पिनर तिथं येणे, याची कल्पनाच कोणी करू शकत नव्हतं. अखेर १९६५ ला बापू रिटायर झाल्यावर शिवलकर मुंबई संघात आले आणि मुंबई क्रिकेट संघाचे मुख्य अस्त्र बनले. रणजी सिझन आला की तो पद्माकर शिवलकर गाजवणारच, हे मुंबईतला लहान मुलगाही सांगेल इतकं स्पष्ट होतं. दर सिझनला भरमसाठ विकेट घेऊनही शिवलकरांच नाव काही भारतीय संघाच्या जवळपास येत नव्हतं.यावेळी त्यांच्या वाट पाहण्याचे कारण होते बिशनसिंग बेदी.
भारतीय क्रिकेटमध्ये ६० आणि ७० ची दशके प्रसन्ना, चंद्रशेखर, व्यंकटराघवन आणि बेदी या स्पिन चौकडीसाठी ओळखली जातात. जगभरात कुठेही गेलं तरी हे चौघे संघातील जागा पक्की करून असायचे. त्यात बेदी हे लेफ्ट आर्म स्पिनर, डोक्याने जरा तापट आणि कामगिरीसोबतच नेतृत्वगुण असल्याने बेदींसारख्या मॅचविनरला बाहेर करून शिवलकरांना संधी देण्याचा विचारही फारसा कोणी केला नसणार. तरीही शिवलकर स्वतःला समजावत ‘अपना टाईम आयेगा’ म्हणायचे. वय वाढत असूनही डोमेस्टिकमध्ये शिवलकरांची फिरकी अजूनच घातक होत चाललेली. अशात बेदीही रिटायर झाले. त्यामुळे शिवलकर यांना टीम इंडियाची कॅप मिळायची आशा निर्माण झाली. मात्र, पुन्हा तेच वाट पाहणं. बेदींचा वारसदार म्हणून दिलीप दोशींचा नंबर लागला. अनुभवी शिवलकरांकडे दुर्लक्ष केले गेले.
अखेर 1981 रणजी सिझननंतर आपल्या 16 वर्षाचे करियर थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी वयदेखील 41 झाल्यानं भारतीय संघात जागा मिळायची आशाही संपलेली… शिवलकर नोकरीत रमू लागले. मात्र, क्रिकेट पूर्णपणे सोडलं नव्हतं. फिटनेससाठी ते मैदानावर यायचे आणि खेळायचे. सात वर्षांनंतर एकेदिवशी असोसिएशनमधून फोन आला. संघाला एका स्पिनरची गरज आहे खेळणार का? आतापर्यंत फक्त क्रिकेट जगलेले पद्माकर शिवलकर अठ्ठेचाळीसाव्या वर्षी पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवायला उभे राहिले. त्यावेळी भारतासाठी खेळत असलेल्या गुंडाप्पा विश्वनाथ आणि रॉजर बिन्नींना आऊट करत त्यांनी दाखवून दिले की, ‘टायगर जिंदा है’…
शेवटी 124 मॅचमध्ये 589 विकेट्स घेत त्यांनी आपलं फर्स्ट क्लास करियर संपवलं… टीम इंडियाची कॅप शेवटपर्यंत त्यांना डोक्यावर घालता आली नाही. नाही म्हणायला, भारतीय संघाकडून खेळण्याची संधी त्यांना एकदा आली. मात्र , ती एका अनॉफिशीयल टेस्टमधून. तरीही फक्त डोमेस्टिक क्रिकेट खेळून पद्माकर शिवलकर नावं अजरामर झालं.
शिवलकरांचा त्यावेळी राहिलेला सन्मान उतारवयात काही प्रमाणात झाला. बीसीसीआयने 2017 मध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. शिवलकर अखेरचे दिसले होते, नुकत्याच पार पडलेल्या वानखेडे स्टेडियमच्या 50 च्या कार्यक्रमात. त्यानंतर आता त्यांची ही एक्झिट नक्कीच मुंबई आणि भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी दुःखद अशीच आहे.
(Story Of Former Cricketer Padmakar Shivalkar)
Story Of Sourav Ganguly: ‘मी पुन्हा येईन’ म्हणून यायची धमक फक्त दादातच होती
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।