Team India Report Card In BGT 2024-2025: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) ऑस्ट्रेलिया दौरा रविवारी (5 जानेवारी) समाप्त झाला. या दौऱ्यात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत (BGT 2024-2025) यजमान ऑस्ट्रेलिया संघाने 3-1 असा विजय मिळवला. भारतीय खेळाडूंना या मालिकेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे मालिका गमावण्यासोबतच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम फेरीत जाण्याची संघाची संधी देखील हुकली. याच मालिकेत भारतीय संघातील खेळाडूंनी कशी कामगिरी केली, याचे रिपोर्ट कार्ड आपण पाहूया.
Team India Report Card In BGT 2024-2025
1) यशस्वी जयस्वाल– युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा होता. आपल्या पहिल्याच दौऱ्यात तो छाप पाडण्यात यशस्वी ठरला. भारतीय संघाने पर्थ कसोटीत एकमेव विजय मिळवला. या कसोटीत यशस्वी याने शानदार शतकी खेळी केली. संपूर्ण दौऱ्यात तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 10 डावांमध्ये 43.44 च्या अप्रतिम सरासरीने 391 धावा केल्या. यामध्ये एक शतक व दोन अर्धशतकांचा समावेश होता. मेलबर्न कसोटीच्या दोन्ही डावात त्याने 80 पेक्षा अधिक धावांच्या खेळ्या केल्या. विशेष म्हणजे त्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांच्याच भाषेत स्लेजिंग करून वाहवा मिळवली. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 8 गुण देण्यात येत आहेत.
2) रोहित शर्मा- भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा या मालिकेत केवळ तीन सामने खेळला. मात्र, तीनही सामन्यात कर्णधार व फलंदाज या दोन्ही नात्याने त्याला अपयश आले. त्याने खेळलेल्या सहा डावांमध्ये फक्त 31 धावा त्याला करता आल्या. सोबतच, भारतीय संघाला दोन सामन्यात पराभूत व्हावे लागले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 1 गुण देण्यात येत आहे.
3) केएल राहुल- अनुभवी केएल राहुल याच्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा होता. पर्थ कसोटीत शानदार अर्धशतक झळकावून त्याने सुरुवात उत्तम केली होती. मात्र, सातत्याचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला. दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर, तिसऱ्या कसोटी त्याने आणखी एक अर्धशतक झळकावले. परंतु, अखेरच्या दोन कसोटीत त्याला पुन्हा एकदा धावांसाठी संघर्ष करावा लागला. असे असले तरी त्याने 30 च्या सरासरीने 276 धावा बनवल्या. विशेष म्हणजे, त्याला कधी सलामीवीर तर कधी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 6 गुण देण्यात येत आहेत.
4) शुबमन गिल- मागील दौऱ्यावर शानदार कामगिरी करणाऱ्या शुबमन गिल याला यावेळी मात्र आपला प्रभाव पाडता आला नाही. त्याला मालिकेत तीन सामने खेळायला मिळाले. परंतु, त्या पाच डावात 18.60 च्या मामुली सरासरीने त्याने केवळ 93 धावा काढल्या. प्रत्येक वेळी खेळपट्टीवर वेळ घालवल्यानंतर, खराब फटका खेळून तो बाद होताना दिसला. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 2 गुण देण्यात येत आहेत.
5) विराट कोहली- आपला पाचवा ऑस्ट्रेलिया दौरा करत असलेल्या अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, पहिल्या सामन्यातील एकमेव शतक वगळता त्याला 8 डावांमध्ये सपशेल अपयश आले. विशेष म्हणजे दरवेळी तो एकाच पद्धतीने बाद होताना दिसला. त्याने मालिकेत 23.8 च्या सरासरीने केवळ 190 धावा केल्या. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 3.5 गुण देण्यात येत आहेत.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
6) नितिशकुमार रेड्डी- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात समाविष्ट केलेला युवा अष्टपैलू नितिशकुमार रेड्डी आपल्या पहिल्याच मालिकेत सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात त्याने अप्रतिम कामगिरी करताना, भारतीय संघ शोधत असलेल्या मध्यमगती गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूची जागा पूर्ण केली. पहिल्या तीन सामन्यात भारतासाठी फलंदाजीत त्याने संकटमोचकाची भूमिका बजावली. तर, मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात पहिले आंतरराष्ट्रीय शतक त्याने पूर्ण केले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचा त्याने धैर्याने सामना केला. मालिकेत त्याने 37.25 च्या सरासरीने 298 धावा काढल्या. तसेच, त्याच्या नावे पाच बळी देखील जमा झाले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 8 गुण देण्यात येत आहेत.
7) रिषभ पंत- भारतीय संघाचा यष्टिरक्षक रिषभ पंत या मालिकेत चर्चेत राहिला. पंत याला 9 डावांत 28.33 च्या सरासरीने फक्त 255 धावा करता आल्या. मागील दौऱ्यातील कामगिरी त्याला पुन्हा एकदा करता नसली आली तरी, त्याने आपले आक्रमक रूप कायम ठेवले. पंत याच्यावर सातत्याने खराब फटके खेळल्याने अनेक माजी खेळाडूंनी टीका केली. यष्टिरक्षक म्हणून रिषभ पुन्हा एकदा उत्कृष्ट दिसून आला. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 5.5 गुण देण्यात येत आहेत.
8) वॉशिंग्टन सुंदर- आपला दुसरा ऑस्ट्रेलिया दौरा करत असलेला वॉशिंग्टन सुंदर यावेळी गोलंदाजीपेक्षा फलंदाजीत अधिक योगदान देताना दिसला. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर त्याने आपल्यातील फलंदाजी कौशल्ये दाखवली. त्याने 5 डावांमध्ये 114 धावा केल्या असल्या तरी, यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता. तसेच त्याने तीन बळी देखील टिपले. रविचंद्रन अश्विन याच्या निवृत्तीनंतर ती जागा घेण्यासाठी आपण सज्ज असल्याचे त्याने दाखवून दिले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 6 गुण देण्यात येत आहेत.
9) रविंद्र जडेजा- पहिल्या दोन सामन्यात बाकावर बसावे लागल्यानंतर तिसऱ्या सामन्यात रविंद्र जडेजा याला संधी मिळाली. त्याने या सामन्यात अर्धशतक करून महत्त्वाचे योगदान दिले. मात्र, तरी देखील 3 सामन्यातील पाच डावात तो 135 धावाच काढू शकला. तर गोलंदाजीतही त्याला केवळ चार बळी मिळवता आले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 4.5 गुण देण्यात येत आहेत.
हे देखील वाचा- काय झालास तू? Virat Kohli साठी संपली अखेरची ऑस्ट्रेलिया टूर, संपूर्ण दौऱ्यावर अशी राहिली कामगिरी, 5 सामने आणि…
10) रविचंद्रन अश्विन- चालू मालिकेदरम्यानच निवृत्त झालेल्या दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने या मालिकेत एकच सामना खेळला. त्याला या सामन्यात फक्त एक बळी मिळवता आला. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 1 गुण देण्यात येत आहे.
11) जसप्रीत बुमराह- कसोटी क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या मालिकेचा खऱ्या अर्थाने नायक ठरला. मालिकावीर पुरस्कार (BGT 2024-2025) जिंकलेल्या बुमराहने आपल्या अविस्मरणीय वेगवान गोलंदाजीने जगभरातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. त्याने 9 डावात गोलंदाजी करताना 18 पेक्षा कमीच्या सरासरीने 32 बळी मिळवले. भारतीय संघाने एकमेव विजय मिळवलेल्या सामन्यात तो कर्णधार म्हणून खेळत होता. संपूर्ण दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी तो सर्वात मोठे आव्हान बनलेला. तसेच, फलंदाजीतही त्याने मोक्याच्या क्षणी योगदान दिले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला पैकीच्या पैकी 10 गुण देण्यात येत आहेत.
12) मोहम्मद सिराज- जसप्रीत बुमराह याच्या साथीने मोहम्मद सिराज हा वेगवान गोलंदाजीची धुरा वाहत होता. त्याने मालिकेत भारतासाठी 150 पेक्षा जास्त षटके टाकली. सिराज याने वेळोवेळी आपल्या गोलंदाजीने विरोधी संघाला अडचणीत टाकले. तसेच, आपल्या आक्रमक स्वभावाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडले. त्याने पाच सामन्यात 31.15 च्या सरासरीने 20 बळी मिळवले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 6.5 गुण देण्यात येत आहेत.
13) आकाश दीप- मायदेशात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर ऑस्ट्रेलियात वेगवान गोलंदाज आकाश दीप याने मिळालेल्या संधीत चांगली कामगिरी केली. त्याने दौऱ्यावर केवळ दोन सामने खेळले. त्याने अचूक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. मात्र, त्याच्या खात्यात केवळ पाच बळी जमा झाले. ब्रिस्बेन कसोटीत त्याने आपल्यातील फलंदाजी कौशल्य दाखवताना भारताला फॉलोऑनपासून वाचवले. दुर्दैवाने, दुखापतीमूळे तो अखेरच्या सामन्यात खेळू शकला नाही. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 6 गुण देण्यात येत आहेत.
14) हर्षित राणा- आयपीएलमध्ये व देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडलेल्या वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला या महत्त्वाच्या दौऱ्यावर नेण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला होता. मात्र, पहिल्या दोन सामन्यात संधी मिळूनही तो या दबावाच्या मालिकेत अपयशी ठरला. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात त्याने तीन बळी मिळवले होते. मात्र, त्यानंतर पुढील डावात तो फक्त एक बळी घेऊ शकला. ऍडलेड कसोटीत एकही बळी न मिळाल्याने त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 4 गुण देण्यात येत आहेत.
15) प्रसिद्ध कृष्णा- आकाश दीप दुखापतग्रस्त झाल्याने प्रसिद्ध कृष्णा याला अखेरच्या सिडनी कसोटीत संधी देण्यात आली. प्रसिद्ध याने मिळालेल्या एकमेव संधीचे सोने करत अप्रतिम कामगिरी नोंदवली. दोन्ही डावात प्रत्येकी तीन बळी त्याने टिपले. दुसऱ्या डावात त्यानेच ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज बाद केल्याने, सामन्यात काहीशी रंगत निर्माण झाली होती. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 6 गुण देण्यात येत आहेत.
16) देवदत्त पडिक्कल- रोहित शर्माच्या अनुपस्थितीत देवदत्त पडिक्कल याला पर्थ कसोटी खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, पहिल्या डावात 23 चेंडू खेळून खातेही खोलण्यात तो अपयशी ठरला होता. तर, दुसऱ्या डावात त्याने 25 धावा बनवल्या. या कामगिरीमुळे त्याला पुढे संधी मिळाली नाही. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 1 गुण देण्यात येत आहे.
17) ध्रुव जुरेल- यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल हा मालिकेपूर्वी (BGT 2024-2025) सराव सामन्यात चमकला होता. मात्र, पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजांनी त्याच्या मर्यादा उघड्या पाडल्या. त्याला पहिल्या डावात 11 व दुसऱ्या डावात केवळ एक धाव करता आली. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 1 गुण देण्यात येत आहे.
(Team India Report Card In BGT 2024-2025)
हे देखील वाचा- सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच टीम इंडियाची शरणागती, तब्बल 10 वर्षांनंतर Border-Gavaskar Trophy ऑस्ट्रेलियाकडे
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।