Breaking News

Team India New Head Coach: केएलच्या सल्ल्याने लॅंगरचा टीम इंडियाचा कोच होण्यास नकार, धक्कादायक खुलाश्याने खळबळ

team india new head coach
Photo Courtesy: X

Team India New Head Coach| भारतीय क्रिकेट संघाचा नवीन प्रशिक्षक बनण्यासाठी अनेक भारतीय तसेच विदेशी प्रशिक्षक पसंती दर्शवत आहेत. त्यासोबतच असेही काही अनुभवी खेळाडू आहेत ज्यांनी यासाठी रस दाखवलेला नाही. बीसीसीआयने प्रस्ताव देऊनही ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने मुख्य प्रशिक्षक बनण्यास नकार दिला. त्यानंतर आता या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जस्टिन लँगर (Justin Langer) याचे नाव आले आहे.

काही दिवसांपूर्वीच लॅंगर याने आपण भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते. बीसीसीआयने देखील त्याच्याकडे विचारणा केल्याचे वृत्त आलेले. त्यानंतर आता लॅंगरने एका मुलाखतीत बोलताना धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाला,

“भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याबाबत मी केएल राहुल याच्यासोबत बोललो. त्यावर तो म्हणाला, तुला आयपीएल संघात कधीतरी थोडासा दबाव आणि राजकारण चालत असल्याचे दिसत असेलच. त्यापेक्षा हजार पट गोष्टी तुला तिथे दिसतील. भारतीय संघाला प्रशिक्षण देणे असे असते.”

राहुलच्या या वक्तव्यामुळे भारतीय संघात दुफळी असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आयपीएलमध्ये राहुल हा लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants) संघाचे नेतृत्व करतो. तर लॅंगर याच संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. यावेळी लखनऊ संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही व ते गुणतालिकेत सहाव्या स्थानी राहिले.

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी आता प्रामुख्याने तीन नावे चर्चेत आहेत. यामध्ये सध्या केकेआर संघाचा मेंटर असलेला गौतम गंभीर, श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज माहेला जयवर्धने व न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांचा समावेश आहे. यांच्या व्यतिरिक्त सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मण याच्या देखील नावाचा विचार होऊ शकतो.

(Team India New Head Coach Justin Langer Opt Out After KL Rahul Advice)

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *