Breaking News

Pro Kabaddi च्या इतिहासातील टॉप 10 रेडर्स! दिग्गजांसह यंगिस्तानही यादीत, पाहा संपूर्ण लिस्ट

PRO KABADDI
Photo Courtesy: X/Pro Kabaddi

Top Raiders In Pro Kabaddi History: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामाला (PKL 11) 18 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. यावर्षी अनेक संघात बदल झाल्यामुळे स्पर्धेची रंगत वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी, आपण आतापर्यंत पीकेएलमधील सर्वात यशस्वी रेडर्सबद्दल जाणून घेणार आहोत.

Top Raiders In Pro Kabaddi History

1) परदीप नरवाल (Pardeep Narwal)- प्रो कबड्डी इतिहासातील सर्वात यशस्वी रेडर म्हणून परदीप नरवाल याचे नाव घेतले जाते. डुबकी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परदीप याने 170 सामन्यात 1690 गुण कमावले आहेत. यापैकी 85 सामन्यात त्याने सुपर टेन लावला होता. बेंगलोर बुल्समध्ये कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर त्याने पटना पायरेट्स संघाला सलग तीन वेळा विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्याने युपी योद्धाज संघाचे प्रतिनिधित्व केले. या हंगामात तो पुन्हा एकदा बेंगलोर बुल्स संघासाठी खेळताना दिसणार आहे.

2) मनिंदर सिंग (Maninder Singh)- ‘मायटी मनिंदर’ अशी ओळख असलेल्या मनिंदर सिंग याने आतापर्यंत केवळ जयपुर पिंक पँथर्स व बंगाल वॉरियर्स या संघांसाठी आपला खेळ दाखवला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मनिंदर याने 143 सामन्यात 1428 गुण मिळवले आहेत. यामध्ये तब्बल 72 सुपर टेन दिसतात. यावेळी तो पुन्हा एकदा बंगाल संघाचा भाग असेल.

3) पवन सेहरावत (Pawan Sehrawat)- ‘प्रो कबड्डीच्या सुरुवातीच्या पाच हंगामात फारसा न दिसलेला पवन सहाव्या हंगामात सर्वात्तम कामगिरी करून गेला होता. त्याने बेंगलोर बुल्सला एकहाती विजेते बनवलेले. त्यानंतर त्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या नावे आत्तापर्यंत 126 सामन्यात 1189 गुण जमा आहेत. ‘हाय फ्लायर’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या पवन याने यावर्षी तमिल थलाईवाजची साथ सोडून तेलुगू टायटन्सच्या तंबूत आपले प्रस्थान केले आहे. टायटन्सला आपले पहिले विजेतेपद पटकावयाचे असल्यास, पवनला सर्वोत्कृष्ट करावी लागेल.

4) राहुल चौधरी (Rahul Choudhari)- भारतीय कबड्डीचा पहिला ‘पोस्टर बॉय’ म्हणून ओळख असलेल्या राहुल चौधरीचा या तालिकेत चौथा क्रमांक लागतो. राहुल याने आपल्या प्रो कबड्डी कारकिर्दीत 154 सामन्यात 1045 गुण कमावले होते. तेलगू टायटन्स, पुणेरी पलटण, तमिल थलाईवाज व जयपुर पिंक पँथर्स या संघाचे त्याने प्रतिनिध्व केले होते. पीकेएल 2024 (PKL 2024) लिलावात त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. त्यानंतर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

5) दीपक निवास हुड्डा (Deepak Niwas Hooda)- भारतीय कबड्डीमधील यशस्वी अष्टपैलूंपैकी एक असलेल्या दीपक निवास हुड्डा याने देखील आपल्या कारकिर्दीत नेहमीच दमदार कामगिरी केली होती. तो मागील हंगामापासून स्पर्धेचा भाग नाही. त्याने आपल्या कारकिर्दीत 157 सामने खेळताना 1020 रेड पॉइंट्स कमावले होते.‌

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

6) नवीन कुमार (Naveen Kumar)- अगदी कमी वयात आणि छोट्याशा कारकीर्दीत नवीन कुमार याने आपली स्वतःची ओळख मिळवली आहे. ‘नवीन एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन याने केवळ 90 सामन्यात 1000 रेड पॉइंट्सचा टप्पा पार केला होता. त्याच्या नावे आत्ता 91 सामन्यात 1005 गुण आहेत. मागील हंगामा दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. या हंगामात त्याच्याकडे या यादीत चौथ्या क्रमांकावर जाण्याची संधी असेल. नवीन आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत केवळ दबंग दिल्ली संघासाठीच खेळत आला.

7) सचिन तंवर (Sachin Tanwar)- गुजरात जायंट्स व पटना पायरेट्स या संघातून आपल्या जबरदस्त खेळाने सर्वांची मने जिंकणाऱ्या सचिन याच्यावर या हंगामात देखील सर्वांची नजर असणार आहे.‌ तो या हंगामात 1000 रेड पॉइंटचा टप्पा पार करू शकतो. त्याने आत्तापर्यंत 128 सामन्यात 952 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे पीकेएल 2024 मध्ये तोच सर्वात महागडा खेळाडू म्हणून सहभागी होईल. त्याच्यावर तमिल थलाईवाजने 2 कोटी 15 लाख इतकी मोठी बोली लावलेली.

8) अर्जुन देशवाल (Arjun Deshwal)- मागील दोन हंगामात जयपुर पिंक पँथर्स संघाच्या यशाचे प्रमुख कारण राहिलेला अर्जुन या वर्षी देखील मोठी कामगिरी करण्यास उत्सुक असेल. त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत केवळ 91 सामने खेळताना 947 रेड पॉइंट कमावले आहेत. त्याचा फॉर्म पाहता तो यावर्षी टॉप 5 मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल.

9) विकास कंडोला (Vikas Kandola)- एकवेळ प्रो कबड्डी मधील सर्वात वेगवान रेडर असलेल्या विकास कंडोला याच्या नावे 120 सामन्यात 800 गुण जमा आहेत. मागील हंगामात तो पूर्णतः अपयशी ठरला होता. पीकेएल 2024 लिलावात त्यालाच आधी कोणीही निवडले नव्हते. मात्र, त्यानंतर तो जयपुर संघाचा भाग बनला आहे. या हंगामात त्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल.

10) अजय ठाकूर (Ajay Thakur)- प्रो कबड्डीच्या सुरुवातीच्या हंगामांमधील सर्वात प्रसिद्ध रेडरपैकी एक असलेल्या अजय ठाकूर याने पीकेएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या नावे 120 सामन्यात 794 गुण जमा आहेत. या हंगामात तो दिल्ली संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये दिसू शकतो.

(Top 10 Raiders In Pro Kabaddi History Pardeep Narwal Top List)

हे देखील वाचा: या दिवशी सुरू होणार PKL 2024, तारखांसह ठिकाणेही जाहीर, पुण्याचे सामने…