Breaking News

USAvBAN| बांगलादेश क्रिकेटची नाचक्की! USA ने मिळवला ऐतिहासिक विजय, हरमीत सिंगचा धडाका

usavban
Photo Courtesy: Screenshot/Fancode

USAvBAN: आगामी टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी बांगलादेश संघ यूएसए दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जातेय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. यजमान युएसए संघाने बांगलादेशला पाच गडी राखून नमवत ऐतिहासिक विजय मिळवला. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू व सध्या युएसए संघाचे प्रतिनिधित्व करत असलेला कोरी अँडरसन व भारतीय वंशाचा हरमीत सिंग या विजयाचे शिल्पकार ठरले.

ह्यूस्टन येथे झालेल्या या सामन्यात यूएसए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, 5.2 षटकात 51 धावा झालेल्या असताना त्यांचे तीन बळी गेले. यानंतर तौहिद हृदय व महमदुल्लाह यांनी अनुक्रमे 56 व 32 धावा करत संघाला 153 अशी सन्मानजनक मजल मारून दिली. यूएसएसाठी स्टीवन टेलर याने सर्वाधिक दोन बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करताना यूएसए संघाच्या सर्वच फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले. त्यांचे 14.5 षटकात 94 धावांवर पाच गडी बाद झाले होते. अखेरच्या 31 चेंडूंमध्ये 60 धावांची गरज असताना अनुभवी कोरी ऍंडरसन (25 चेंडू 34 धावा) व अष्टपैलू हरमीत सिंग (13 चेंडू 33 धावा) यांनी आक्रमक फटकेबाजी केली. दोघांनी अखेरपर्यंत नाबाद राहत आपल्या संघाला तीन चेंडू राखून विजय मिळवून दिला. मालिकेत आणखी दोन सामने होणार असून, यूएसए संघाकडे मालिका विजयाची ऐतिहासिक संधी असेल.

(Host USA Register 5 Wickets Historic Win Over Bangladesh In First T20I)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *