Breaking News

स्मिथच्या झंझावातात उडाले कमिन्सचे युनिकॉर्न्स! वॉशिंग्टन फ्रीडम बनला MLC 2024 चॅम्पियन

mlc 2024
Photo Courtesy: X/MLC

Washington Freedom MLC 2024 Champions: अमेरिकेतील व्यावसायिक टी20 लीग असलेल्या मेजर लीग क्रिकेट म्हणजेच एमएलसी (MLC 2024) स्पर्धेचा दुसरा हंगाम सोमवारी (29 जुलै) समाप्त झाला. डेल्लास येथे झालेल्या अंतिम सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडम (Washington Freedom) संघाने कॅलिफोर्निया युनिकॉर्न्सचा (California Unicorns) 96 धावांनी मोठा पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले.

साखळी फेरीत पहिल्या दोन स्थानी राहिलेल्या या संघांनी प्ले ऑफनंतर अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात वॉशिंग्टन संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. ट्रेविस हेड केवळ नऊ धावांवर बाद झाल्याने संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर आलेल्या ऍड्रियन गौस व रचिन रविंद्र यांनी अनुक्रमे 21 व 11 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने कर्णधार स्टीव स्मिथ (Steve Smith) याने आपला शानदार फॉर्म कायम राखला.

स्मिथ याने 52 चेंडूंमध्ये 7 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने 88 धावांची खेळी केली. त्याला ग्लेन मॅक्सवेलने 40 धावा करून साथ दिली. अखेर मुक्तार याने 19 व पिएरने 13 धावा करत संघाला 207 पर्यंत मजल मारून दिली. कॅलिफोर्निया संघासाठी कर्णधार कमिन्स याने सर्वाधिक दोन बळी मिळवले.

विजयासाठी मिळालेल्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना कॅलिफोर्निया संघ सुरुवातीपासूनच अडखळला. मार्को जेन्सन व सौरभ नेत्रावलकर या डावखुऱ्या वेगवान जोडीने त्यांच्या फलंदाजांना मोठे फटके खेळू न देता नियमित अंतराने बाद केले. कॅलिफोर्नियासाठी दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी सर्वाधिक 20 धावा बनवल्या. रचिन रवींद्र याने अखेरचे तीन गडी बाद करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा ‌स्टीव्ह स्मिथ हा स्पर्धेचा मानकरी ठरला. तर, सौरभ नेत्रावळकर याने सर्वाधिक बळी मिळवले. स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद एमआय न्यूयॉर्क संघाने मिळवले होते.

(Washington Freedom Won MLC 2024)