Breaking News

कोलकात्यात मिळाली मात, टीम इंडियासाठी WTC 2025-2027 फायनलची अवघड वाट

wtc 2025-2027
Photo Courtesy: X

WTC 2025-2027 Final Scenario For Team India: कोलकाता येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) असा पहिला कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 30 धावांनी विजय संपादन केला. भारतीय संघाला आपल्या दुसऱ्या डावात 124 धावा करण्यात अपयश आले. या पराभवानंतर भारतीय संघाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत घसरण झाली. उर्वरित स्पर्धेत भारतीय संघाला आता कंबर कसून कामगिरी करावी लागणार आहे.

WTC 2025-2027 Final Scenario For Team India

कोलकाता कसोटी सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होता. या मालिकेतील दोन सामने जिंकत, दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याची संधी भारतीय संघाकडे होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकून चौथ्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. तर, भारतीय संघाची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली.

नव्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आपले तीनही सामने जिंकून 100 टक्के सरासरीसह अव्वल क्रमांकवर आहे. तर दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकत 66.67 अशी सरासरी राखली. श्रीलंकेने देखील 2 सामन्यात एक विजय व एक ड्रॉ अशी कामगिरी करून 66.67 ही सरासरी कायम ठेवली आहे. भारताने आत्तापर्यंत या सायकलमध्ये सर्वाधिक आठ सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात भारताने विजय संपादन केलेला आहे. तर, तीन सामने गमावत एक सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे भारतीय संघ 54.17 या सरासरीसह चौथ्या क्रमांकावर काबीज असलेला दिसतो. पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश व वेस्ट इंडिज यांचा त्यानंतर क्रमांक लागतो. न्यूझीलंडने या सायकलमध्ये अद्याप एकही सामना खेळला नाही.

भारतीय संघ या सायकलमध्ये आणखी 10 सामने खेळेल. यामध्ये चालू असलेल्या मालिकेतील एक सामना आहे. त्यानंतर श्रीलंकेत श्रीलंकेविरुद्ध दोन सामने व न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडमध्ये दोन सामने खेळले जाणार आहेत. तर, सायकलच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांचे यजमानपद भूषवेल. भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचायचे असल्यास, आणखी सहा-सात सामने जिंकावे लागू शकतात.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ईडनवर टीम इंडियाची निघाली लाज! Kolkata Test मध्ये 124 धावांचा पाठलाग करताना भारत 30 धावांनी पराभूत

जुना भिडू तरी ईडनवर मिळाली नवी ओळख! Simon Harmer ची जबरदस्त स्टोरी