Breaking News

WTC Final 2025 Day 1: पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा! वेबस्टर-स्मिथनंतर गोलंदाजांची कमाल

wtc final 2025 day 1
Photo Courtesy: X

WTC Final 2025 Day 1: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना (WTC Final 2025) क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lords) खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्या दरम्यान होत असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलिया अष्टपैलू ब्यू वेबस्टर (Beau Webster) हा पहिल्या दिवसाचा नायक ठरला.

WTC Final 2025 Day 1 Updates

जून 2023 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सायकलमध्ये ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांनी पहिल्या दोन क्रमांकावर आपले अभियान समाप्त केले. त्यानंतर या दोन संघांमध्ये हा अंतिम सामना खेळला जात आहे. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होत असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय अनुभवी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने योग्य ठरवला. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर उस्मान ख्वाजा याला त्याने 20 चेंडूनंतरही खाते न खोलता माघारी पाठवले. मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत असलेला कॅमेरून ग्रीन तीन चेंडूंमध्ये चार धावा करून रबाडाचाच शिकार ठरला.

संघ अडचणीत सापडल्यानंतर माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने चिवट मार्नस लाबुशेन याला साथीला घेत किल्ला लढवला. दोघांची भागीदारी बनते असे वाटत असताना, लाबुशेन 17 धावा करून माघारी परतला. तर, पहिल्या सत्रातील अखेरच्या षटकात ट्रेविस हेड हा देखील 11 धावांची भर घालून बाद झाला. या दोघांनाही मार्को यान्सन याने बाद केले. पहिल्या सत्राच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने 4 बाद 67 अशी मजल मारली होती.

WTC Final 2025 Day 1 Updates

दुसऱ्या सत्रात स्मिथ व वेबस्टर ही जोडी जमली आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. या जोडीने महत्त्वपूर्ण 79 धावांची भागीदारी केली. स्मिथ 112 चेंडूत 66 धावा करत ऐडन मार्करम याच्या चेंडूवर झेलबाद झाला. आपल्या या खेळी दरम्यान स्मिथ याने लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सर्वाधिक धावा करणारा विदेशी फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याच्या जागी आलेल्या एलेक्स केरी याने आक्रमक 23 धावा बनवून, ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुढे केले. यादरम्यान वेबस्टर याने आपले अर्धशतक झळकावले. केरी बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. वेबस्टर याने संघासाठी सर्वाधिक 72 धावांची खेळी केली. यासाठी त्याने केवळ 92 चेंडू घेतले.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केव्हा 212 धावांवर समाप्त झाला. कगिसो रबाडा याने सर्वाधिक पाच बळी (Kagiso Rabada Fifer) टिपले. त्याच्या जोडीला मार्को यान्सन याने तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करत सहकार्य केले. फिरकीपटू केशव महाराज व ऐडन मार्करम यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

पहिल्या दिवशीच फलंदाजीची वेळ आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही खराब झाली. अनुभवी ऐडन मार्करम याचा पहिल्याच षटकात शून्यावर मिचेल स्टार्क याने त्रिफळा उडवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विहान मलडर याला कमिन्सने सहा धावांवर बाद केले. दुसरा सलामवीर रिकलटन 16 धावांवर स्टार्कचीच शिकार ठरला. तर, जोश हेझलवूड याने देखील आपले खाते खोलताना ट्रिस्टन स्टब्सला त्रिफळाचित केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा 3 तर डेव्हिड बेडींगम 8 धावांवर खेळत होता.

दक्षिण आफ्रिका अद्याप 169 धावांनी पिछाडीवर आहे. त्यांना ही पिछाडी भरून काढत, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. तर, ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेला लवकरात लवकर ‌बाद करण्याचा प्रयत्न करेल.

WTC Final 2025 Day 1 Updates

हे देखील वाचा: WTC Final 2025 साठी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेने घोषित केल्या प्लेईंग 11, वाचा कोणाला मिळाली संधी

याला सातत्य ऐसे नाव! Steve Smith ने स्वतःला पुन्हा सिद्ध केले ‘बिग मॅच प्लेअर’, 7 सामने…