IPL 2024 Final|आयपीएल 2024 च्या सामन्यातील संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवलेल्या कोलकाता नाईट रायडर्स सोबत आता दुसऱ्या क्वालिफायरचा विजेता सनरायझर्स हैदराबाद खेळेल. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर (26 मे) रोजी हा सामना खेळला जाईल. आयपीएल 2024 तसेच इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू असलेल्या मिचेल स्टार्क (Mitchell Starc) व पॅट कमिन्स (Pat Cummins) यांनी आपल्यावर लावलेली बोली सार्थ ठरवत संघांना अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले.
आयपीएल 2024 लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याच्यावर तब्बल 24 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावली होती. विशेष म्हणजे स्टार्क 9 वर्षानंतर आयपीएल खेळत होता. त्याच्यावर इतकी मोठी बोली लावल्यानंतर केकेआर संघ व्यवस्थापनावर मोठी टीका झाली होती. मात्र, मोक्याच्या क्षणी त्याने आपला खेळ उंचावत अखेरच्या काही साखळी सामन्यात अचूक गोलंदाजी केली. तसेच, पहिल्या क्वालिफायरमध्ये तो सामनावीर ठरला. त्याने आतापर्यंत स्पर्धेत 13 सामने खेळताना 15 बळी मिळवले आहेत. चार आयसीसी ट्रॉफी नावे असलेला स्टार्क फायनलमध्ये देखील कमाल करू शकतो.
स्टार्कच्या फक्त 40 मिनिटे आधी आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या पॅट कमिन्स याने देखील आपला जलवा दाखवला. आरसीबीला मागे टाकत सनरायझर्स हैदराबादने त्याच्यावर 20 कोटी 50 लाखांची तगडी बोली लावलेली. एकाच वर्षात वनडे विश्वचषक व जागतिक कसोटी चॅम्पियनशिप, अशा दोन आयसीसी ट्रॉफी ऑस्ट्रेलियाला जिंकून देणारा कर्णधार कमिन्स याने सनरायझर्स हैदराबादच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. ऐडन मार्करम याच्याकडून नेतृत्व स्वीकारल्यानंतर कमिन्सने पहिल्या सामन्यापासून आपल्या नेतृत्वाची झलक दाखवली. तसेच, गोलंदाज आक्रमणाचे नेतृत्व करताना 14 सामन्यात सतरा बळी मिळवले. त्याच्या नेतृत्वामुळे सनरायझर्स हैदराबाद अंतिम सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून उतरतील.
(Starc Cummins Worth There Value KKR And SRH Into IPL 2024 Final)