Breaking News

विश्वविजयातील झाकोळलेला शिलेदार Ajit Agarkar

ajit agarkar
Photo Courtesy: X/BCCI

– वरद सहस्रबुद्धे

टी20 वर्ल्डकप (T20 World Cup 2024) जिंकून एक आठवडा उलटला तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांचा विजयाचा हँगओव्हर उतरलेला नाही. रिल्स, स्टोरीज, पोस्ट या सर्वांमधून चाहते टीम इंडियाला शुभेच्छा देताना दिसत आहेत. विजयी खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांच्याविषयी माहिती शोधली जात आहे. रिषभ पंतपासून थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूपर्यंत सगळ्यांच्या बद्दल चार शब्द लिहले-वाचले-बोलले गेले. परंतु एका माणसाला क्रेडिट द्यायला चाहते नकळतपणे विसरले तो म्हणजे अजित आगरकर (Ajit Agarkar). ज्या द्रविडने करियरमध्ये सपोर्ट केला त्याला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी पार पाडणारा निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर.

जेव्हा भारतीय संघ 2019 वनडे वर्ल्डकप हरला तेव्हा तत्कालीन निवडसमिती अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) याला विजय शंकरला निवडल्यामुळे अथवा अंबाती रायडूला वगळल्यामुळे तसेच, एकही डावखुरा वेगवान गोलंदाज नसल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. उलट पक्षी 2011 वर्ल्डकप जिंकल्यावर अश्विनच्या निवडीमुळे अथवा जास्तीत जास्त पार्ट-टाईम बॉलर निवडल्याने के. श्रीकांतचं देखील कौतुक झाले. आज आगरकर बाबतीत निवडसमिती अध्यक्ष या नात्याने दोन्ही गोष्टी वर्ल्डकप जिंकल्यावर सुध्दा वाचायला मिळाल्या नाहीत. जितके रोहित- पांड्या- कोहली- अक्षर-बुमराह-द्रविड कौतुकास पात्र आहेत तेवढंच कौतुक अजित आगरकर देखील डिझर्व्ह करतो.

आगरकरने निवड समिती अध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर आगामी दोन विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्यानंतर झालेल्या बहुतांश दौऱ्यावर हजेरी लावली. रोहित आणि कोहलीसारख्या सिनियरशी चर्चा देखील निवडीसंदर्भात करताना दिसायचा. त्यातुनच जयस्वाल, दुबे अंतिम 15 मध्ये निवडले गेले आणि शुबमन गिल स्टॅन्डबाय खेळून निवडला गेला. अमेरिकेला पेस फ्रेंडली विकेट्सवर मॅचेस असल्याने दुबेला घेण्यामागे सहावा बॉलर (आणि तो ही पेसर) मिळणं हा देखील आगरकर आणि निवडसमिती सदस्यांचा हेतू होता.

वेस्ट इंडिजचा पीचेस आता पुर्वीसारख्या राहिल्या नाहीत, त्या आता फिरकीसाठी पोषक आहेत. विकेट स्लो होत्या त्यामुळे चहलच्या रूपाने अतिरिक्त स्पिनर देखील निवडण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा फ्रॅंचाईजी क्रिकेट असो, वेस्ट इंडिजमध्ये लेफ्ट आर्म स्पिनर गेल्या काही काळात चांगली कामगिरी करताना दिसतात. ईमाद वासिम, विकी ओस्तवाल, गुडाकेश मोती, अकील हुसैन ही काही उदाहरणे. त्याच अनुषंगाने जडेजा-अक्षर आणि कुलदीप हे तीन लेफ्टी स्पिनर वर्ल्डकप मोहिमेसाठी रवाना झाले.

यावेळी बॅक-अप म्हणून निवडलेले खेळाडू तितकेच गुणवान होते. दुबेने हार्दिकला पुरक खेळ केला. आयपीएलची कामगिरी आणि पंतचा फिटनेसबाबत साशंकता या अनुषंगाने पंतला पर्यायी म्हणून संजू सॅमसनला निवडले. जडेजाला अक्षर हा बॅक-अप खेळाडू म्हणून निवडले. पण आज वर्ल्डकप संपल्यावर कोण कोणाचा बॅक-अप किंवा पर्यायी खेळाडू होता हा संशोधनाचा विषय असेल.

हे देखील वाचा- .. आज सफल झाली सेवा!!!

वर्ल्डकपच्या आधी झालेल्या सिरीजमध्ये एखादा खेळाडू तुफानी कामगिरी करतो आणि वर्ल्डकपचं तिकीट घेऊन जातो. विजय शंकर (2019 वर्ल्डकप), स्टुअर्ट बिन्नी (2015 वर्ल्डकप). वरूण चक्रवर्ती (2022 टी20 वर्ल्डकप) यावेळी अशी सरप्राईज किवा रमी जोकर टाईप निवड केली नाही..ज्यांनी आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात चांगली कामगिरी त्यांनाच वर्ल्डकपचं तिकिट देण्यात आले. 17 वर्षानी जेतेपद मिळण्यात हा एक महत्त्वाचा फॅक्टर होता.

अनुभवाला या विश्वचषकात योग्य तऱ्हेने वापरले गेले. कोहली आणि रोहित या वर्ल्डकपला आणि एकंदरीत टी20 क्रिकेट खेळतील की नाही हा पेच गेले वर्षभर निवडसमिती समोर होता. तो पेच खऱ्या अर्थाने आगरकरने सोडवला. शेवटची संधी या नावाखाली दोघांनाही या वर्ल्डकपला निवडले. याशिवाय बॅटिंग लाईन-अप ही गेल्या वर्ल्डकपच्या तुलनेत (अपवाद के एल राहुल) तीच ठेवली. वर्ल्डकपचा अनुभव असलेली बॅटिंग युनिट ठेवणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे यामुळे आज भारताला 29 जूनला दिवाळी साजरी करता आली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

एक उत्कृष्ट अष्टपैलू असतानाही आगरकर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सचिन-गांगुली- कुंबळे- सेहवाग यांच्या छायेत असताना झाकोळला गेलेला. लॉर्ड्स शतक असो किंवा वनडेमधील जलद फिफ्टी असो किंवा जलद 50 विकेट, त्याच्याबद्दल खेळाडू असताना देखील फारसं बोललं गेलं नाही आणि आज निवडसमिती अध्यक्ष झाल्यावर त्याने निवडलेल्या टीमचं कौतुक झालं, पण त्याच्याविषयी ना माजी खेळाडू असो मिडीया असो किंवा क्रिकेटप्रेमी कोणीही गौरवोद्गार काढले नाही. निःसंशय अजित भालचंद्र आगरकर विश्वचषक विजेतेपद मोहिमेचा झाकोळलेला शिलेदार आहे.

(Unsung Hero Of Team India T20 World Cup Triumph Selection Committee Chairman Ajit Agarkar)