ZIM vs IND: भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याची (India Tour Of Zimbabwe 2024) रविवारी (14 जुलै) अखेर झाली. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 42 धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशी आपल्या नावे केली. या सामन्यात संजू सॅमसन (Sanju Samson) सामनावीर ठरला.
5TH T20I. India Won by 42 Run(s) https://t.co/TZH0TNJKro #ZIMvIND
— BCCI (@BCCI) July 14, 2024
यापूर्वीच मालिका नावे केलेल्या भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, मागील सामन्यात नाबाद 93 धावा करणारा यशस्वी जयस्वाल पाचव्या चेंडूवर माघारी परतला. कर्णधार शुबमन गिल व अभिषेक शर्मा हे देखील मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. त्यानंतर संजू सॅमसन व रियान पराग ही जोडी जमली. दोघांनी महत्त्वपूर्ण 65 धावा जमवल्या. रियानने 22 धावा केल्या.
संजूने आपल्या कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण करताना 55 धावांची खेळी केली. शिवम दुबेने 26 धावांचे योगदान दिले. या सर्वांच्या योगदानामुळे भारतीय संघाने 167 पर्यंत मजल मारली.
या धावांचा पाठलाग करताना मेधवेरे तिसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर ब्रायन संघाच्या 15 धावा झालेल्या असताना तंबूत परतला. मारूमनी व मायर्स यांनी यानंतर 45 धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र, मारूमनी बाद झाल्यानंतर कर्णधार सिकंदर रझा व इतर फलंदाज पाठोपाठ बाद झाले. अक्रम याने अखेरचा प्रयत्न म्हणून 13 चेंडूत 27 धावांची खेळी केली. मात्र, शेवटच्या दोन फलंदाजांना बाद करत मुकेश कुमारने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
(ZIM vs IND India Clinch T20I Series With 4-1 Against Zimbabwe)