Breaking News

Euro 2024 Final Preview: स्पेन की इंग्लंड? कोण होणार युरोपियन फुटबॉलचा अधिपती?

euro 2024 final
Photo Courtesy: X/Euro

Euro 2024 Final: युरोपियन फुटबॉलची सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या युरो 2024 (Euro 2024) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (14 जुलै) खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11.30 वाजल्यापासून सामन्याच्या प्रक्षेपणाला सुरुवात होईल. बर्लिन येथे होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या अंतिम सामन्यात स्पेन आणि इंग्लंड (SPA vs ENG) आमने-सामने असणार आहेत. स्पेन 12 वर्षानंतर तर, इंग्लंड प्रथमच युरो कप जिंकण्याचा प्रयत्न करेल (Euro 2024 Final Preview).

युरो 2024 च्या पहिल्या सामन्यापासून जबरदस्त खेळ दाखवणाऱ्या स्पेनला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणून ओळखल्या गेलेल्या ब गटात समावेश असलेल्या स्पेनने निर्भळ यश मिळवले होते. त्यांनी पहिल्या सामन्यात क्रोएशियाचा 3-0 असा सहज पराभव केला. त्यानंतर इटली व अल्बेनिया यांना 1-0 अशी मात देत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला.

नॉक आऊटमध्ये आल्यानंतर स्पेनचा खेळ उंचावला व त्यांनी जॉर्जियाचा 4-1 असा धुव्वा उडवला. उपांत्यपूर्व फेरीत एक्स्ट्रा टाईमच्या अखेरच्या मिनिटाला मेरीनो याच्या गोलमुळे त्यांनी यजमान जर्मनीला 2-1 अशी मात दिली. सेमी फायनलमध्ये फ्रान्सविरूद्ध पिछाडीवरून पुनरागमन करत 2-1 असा विजय मिळवून त्यांनी अंतिम सामन्यात जागा पक्की केली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

दुसऱ्या बाजूला इंग्लंड युरो 2020 ची उपविजेता म्हणून स्पर्धेत सहभागी झाला होता. मात्र, त्यांनी गट फेरीत तितकीशी चांगली कामगिरी केली नाही. सर्बियाविरूद्ध ते 1-0 असा विजय मिळवण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर डेन्मार्कविरुद्ध त्यांना 1-1 अशी बरोबरी साधावी लागली. स्लोव्हेनियानेदेखील त्यांना गोलशून्य बरोबरीत रोखण्याचे काम केले.

राऊंड ऑफ 16 मध्ये स्लोवाकियाने त्यांना जवळपास पराभूत केले होते. मात्र, पूर्णवेळेच्या अखेरच्या मिनिटात बेलिंघम याने केलेल्या गोलमुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. त्यामध्ये कर्णधार हॅरी केन (Harry Kane) याने केलेल्या गोलमुळे त्यांना स्पर्धेत पुढे चाल करता आली. उपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शूटआउटमध्ये त्यांनी स्वित्झर्लंडला बाहेरचा रस्ता दाखवला. तर, उपांत्य फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सने त्यांना चांगली झुंज दिली. ओली वॅटकिन्स याने पुन्हा एकदा शेवटच्या मिनिटांमध्ये गोल करून इंग्लंडला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले.

अंतिम सामन्यात दोन्ही संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूंवर सर्वांची नजर असेल. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन व स्पेनचा डॅनी ओल्मो यांच्यात गोल्डन बूटसाठी शर्यत असेल. स्पेनकडून लमिन यमाल (Lamine Yamal), फेरान टोरेस, निको व मोराता यांच्याकडे गोल करण्याची विशेष जबाबदारी असेल. इंग्लंडला गोलसाठी कर्णधार केनसह, बेलिंघम, साका व टोनी यांना प्रयत्न करावे लागतील.

इंग्लंड सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांना आपले पहिले युरो विजेतेपद मिळवून चाहत्यांची ‘इट्स कमिंग होम’ ही घोषणा पूर्ण करावी लागेल. तर, स्पेन 12 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्न करेल.

(Euro 2024 Final Preview England vs Spain)