Breaking News

सेमी फायनलमध्येही सपशेल फेल ठरणाऱ्या Virat Kohli बद्दल कर्णधार रोहित म्हणाला, “त्याने अंतिम सामन्यासाठी…”

Rohit Sharma On Virat Kohli : टी20 विश्वचषकातील भारतीय संघाचा विजयरथ सुसाट सुटला आहे. साखळी फेरी, मग सुपर 8 फेरी त्यानंतर उपांत्य फेरीतही अपराजित राहत भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. गुरुवारी (22 जून) गयानाच्या स्टेडियमवर पावसाने प्रभावित सामन्यात इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करत भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता 29 जून रोजी अंतिम सामन्यात त्यांची लढत दक्षिण आफ्रिकेशी होईल. असे असले तरीही, भारतीय संघासाठी स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. अद्याप विराटला सूर गवसू शकलेला नाही. मात्र कर्णधार रोहित शर्माने विराटला पाठींबा दर्शवला आहे. 

सलामीवीराच्या भूमिकेत विराट सपशेल फ्लॉप ठरताना दिसत आहे. विराटने अद्याप टी20 विश्वचषक 2024 मध्ये एकही अर्धशतक केलेले नाही. आतापर्यंतच्या 7 सामन्यांत विराटला केवळ 75 धावा करता आल्या आहेत. यादरम्यान 37 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली आहे. विराट उपांत्य सामन्यात तरी मोठी खेळी करू शकेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु उपांत्य सामन्यातही 9 चेंडूत 9 धावा करत विराट बाद झाला. त्यामुळे आता अंतिम सामन्यातील त्याच्या जागेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच कर्णधार रोहितने मात्र विराटला पूर्णपणे समर्थन दिले आहे.

कर्णधार रोहितचे विराटबाबतचे वक्तव्य
सामना संपल्यानंतर जेव्हा प्रेजेंटरने विराटच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारला तेव्हा कर्णधार रोहित म्हणाला, “कोहली एक दर्जेदार खेळाडू आहे. कोणताही खेळाडू या टप्प्यातून जाऊ शकतो. आम्हाला त्याचा क्लास समजतो आणि या सर्व मोठ्या सामन्यांमध्ये त्याचे महत्त्व आम्हाला कळते. विराटचा फॉर्म कधीही आमच्यासाठी समस्या नाही. जेव्हा तुम्ही 15 वर्षे क्रिकेट खेळता तेव्हा फॉर्म हा मुद्दा कधीच नसतो. तो चांगला दिसत आहे. त्याचा हेतू एकच आहे. तो कदाचित अंतिम सामन्यासाठी आपले सर्वोत्तम वाचवत असेल. अंतिम सामन्यासाठी आम्ही कोहलीला पूर्ण पाठिंबा देऊ,” असे रोहितने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *