![ipl 2024 qualifier 2 preview](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/05/ipl-2024-qualifier-2-preview.jpg)
IPL 2024 Qualifier 2 Preview| आयपीएल 2024 चा अंतिम टप्पा खेळला जात आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये केकेआरने सनरायझर्स हैदराबादला मात देऊन अंतिम फेरीत धडक मारली. तर, एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आता क्वालिफायर 2 सामन्यात शुक्रवारी (24 मे) सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स आमने-सामने येणार आहेत. या सामन्यातील विजेता अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
सनरायझर्स हैदराबादला पहिल्या क्वालिफायरमध्ये आठ गड्यांनी निराशाजनक पराभव पहावा लागला. तर, राजस्थानने एलिमिनेटरमध्ये सहज विजय मिळवला. त्यामुळे या सामन्यात मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो. दोन्ही संघ आत्तापर्यंत 19 वेळा आमने-सामने आले असून, 10 विजय हैदराबादच्या बाजूने गेले आहेत. मात्र, या अतिमहत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न राजस्थान संघ करेल.
हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल. ही खेळपट्टी प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे हा सामना मोठ्या धावसंख्येचा होण्याची शक्यता कमी आहे. तसेच, सामन्यावर पावसाचे थोडे सावट असेल. मात्र, सामना पूर्ण होण्याची शक्यता अधिक आहे.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सची सर्वात मोठी मदार त्यांचे अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व युझवेंद्र चहल यांच्यावर असेल. अश्विन याचे हे घरचे मैदान असल्याने तो सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे हैदराबादची फिरकी बाजू काहीशी कमजोर दिसत असल्याने, मयंक मार्कंडेय व ऐडन मार्करम यांना सनरायझर्स संधी देऊ शकते.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
राजस्थान रॉयल्स- यशस्वी जयस्वाल, डोनोवन फरेरा, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रॉवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, आवेश खान व संदीप शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर- शिमरॉन हेटमायर
सनरायझर्स हैदराबाद- ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, ऐडन मार्करम, हेन्रिक क्लासेन, शाहबाज अहमद, नितिश रेड्डी, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार व टी नटराजन.
इम्पॅक्ट प्लेयर– मयंक मार्कंडेय
(IPL 2024 Qualifier 2 Preview: SRH & RR Looking For Final Spot)