![PRATIK WAIKAR](https://kridacafe.com/wp-content/uploads/2025/01/PRATIK-WAIKAR.jpg)
Story Of Kho-Kho Captain Pratik Waikar : नवी दिल्ली येथे 13 जानेवारीपासून पहिल्या खो-खो विश्वचषक (Kho-Kho World Cup 2025) विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागाच्या स्पर्धा एकाच वेळी खेळल्या जातील. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व पुणेकर प्रतिक वायकर (Pratik Waikar) हा करतोय. आज आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया.
Story Of India’s Kho-Kho Captain Pratik Waikar
Pratik Waikar, inspired by a local player's success, overcome financial struggles to rise in Kho Kho. With a strong academic background and a passion for sports science, he’s ready to lead India to victory at the inaugural Kho Kho World Cup! #TheWorldGoesKho #KhoKhoWorldCup pic.twitter.com/HteMpPPF3u
— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) November 7, 2024
प्रतिक हा पुण्याचा. पुण्याच्या नूमवि प्रशालेचा तो विद्यार्थी. घरात खेळाला प्रोत्साहन देणारे वातावरण होते म्हणून आधी फिटनेससाठी तो बास्केटबॉल खेळू लागला. सर परशुराम महाविद्यालयाच्या प्रांगणात तो बास्केटबॉल खेळायला जायचा. तिथेच लंगडी आणि गोल खो-खोदेखील खेळले जायचे. त्याला त्यात देखील आवड निर्माण झाली. वयाच्या आठव्या नवव्या वर्षीच तो उत्तम खो-खो खेळू लागला. त्याची खेळातील प्रगती पाहून पुण्यातील नामांकित नवमहाराष्ट्र संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. तिथून सुरू झाली खो-खोपटू प्रतिक वायकर याची सुरुवात.
मोठा भाऊ हा खेळाडूच असल्याने प्रतिक याला विरोध होण्याचे कारण होते. घरची परिस्थिती देखील चांगली होती त्यामुळे तो खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकला. अवघ्या दोन वर्षात तो महाराष्ट्राच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघात निवडला गेला. पुढे त्या संघाचे नेतृत्व देखील त्याला करायला मिळाली. प्रतिक हा एकमेव असा खो-खो खेळाडू आहे ज्याने महाराष्ट्राचे तीन वयोगट (14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील व 18 वर्षाखालील) व वरिष्ठ संघाचे नेतृत्व केले. संघाचे नेतृत्व मिळाल्यानंतर त्याने व्यावसायिक खो-खो खेळाडू बनण्याचा निर्धार केला.
स्पोर्ट्स कट्टा यांनी घेतलेली प्रतिक वायकर याची मुलाखत
प्रतिक याला वयाच्या केवळ 19 वर्षी महाराष्ट्र राज्य वीज मंडळात नोकरी मिळाली. इतक्या कमी वयात नोकरी मिळाल्याने तो खेळावर पूर्णपणे लक्ष देऊ लागला. प्रतिक आपल्या या आतापर्यंतच्या यशाचे श्रेय महावितरणच्या आपल्या सहकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना देखील नेहमीच देत असतो. नोकरी आणि खेळासोबतच अभ्यासातही प्रतिक कोठेच कमी पडत नव्हता. त्याने देशभर खेळाने नाव कमवताना बॅचलर ऑफ सायन्स पदवी घेतली आणि पुढे फायनान्समध्ये एमबीए देखील केलं. आपल्या मुलाने मोठे शिक्षण घ्यावं, अशी त्याच्या आईची इच्छा होती. ती देखील त्याने पूर्ण केली.
हे देखील वाचा- सोमवारपासून पहिल्या Kho-Kho World Cup चा थरार! टीम इंडियाची मदार महाराष्ट्राच्या खांद्यावर
प्रतिक याचा भारताच्या खो-खो क्षेत्रात अक्षरशः दबदबा आहे. तो भारतातील सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. तब्बल दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून तो खो-खो खेळतोय. त्याच्यातील नेतृत्वगुणांमुळे त्याला ‘कॅप्टन कूल’ असेही म्हणतात. विशेष म्हणजे तो भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एमएस धोनी याचा मोठा चाहता आहे. तसेच, फिटनेससाठी तो विराट कोहली याला आदर्श मानतो.
प्रतिकचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खो-खोमधील प्रोफाइल जबरदस्त आहे. वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये तब्बल 10 पदके त्याने जिंकली असून, त्यात तीन सुवर्ण व सात रौप्य पदके समाविष्ट आहेत. यासोबत फेडरेशन नॅशनलमध्ये 6 सुवर्णपदके त्याच्या नावावर आहेत. तसेच ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये देखील त्याने सुवर्णपदक जिंकलेले. भारताने 2016 मध्ये सॅफ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. प्रतिक त्या संघाचा देखील सदस्य होता. प्रतिकच्या नावावर एकलव्य पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देखील आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
खो-खो खेळाला नवी ओळख देणाऱ्या अल्टिमेट खो-खो स्पर्धेत देखील त्याचा बोलबाला राहिला. तेलुगू योद्धाज संघाचे नेतृत्व करताना त्याने पहिल्या हंगामात 55 गुण मिळवले होते. तर, 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बचाव केलेला. दुसऱ्या हंगामात तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
शाळा कॉलेजमध्ये खेळला जाणारा खो-खोचा खेळ आता ग्लोबल झालाय. याच खो-खोचा पहिला वर्ल्डकप भारतात होत असताना, पुणेकर प्रतिक वायकरच्या हातात तो वर्ल्डकप पाहायची इच्छा प्रत्येक खो-खो प्रेमी आणि भारतीय नक्कीच व्यक्त करतोय.
(Story Of Kho-Kho Captain Pratik Waikar)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।