
Lakshya Sen In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्ससाठी क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या मेडलचे 15 दावेदार या सदरातील पुढील खेळाडू आहे युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen).
(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Lakshya Sen)
2 days to go #Paris2024
We supported @lakshya_sen at 10 yrs. Brought him from Almora to PPBA. The other pic was 8 yrs ago with his gurus Prakash Sir & Vimal Sir. That kid is about to play his 1st Olympics. Been a long & hard 13 yr journey to get here. @OGQ_India pic.twitter.com/wjhugg3zSG
— Viren Rasquinha (@virenrasquinha) July 24, 2024
खऱ्या अर्थाने भारतात सुरू झालेला मात्र इतर आशियाई देशांनी आपलासा खेळ म्हणजे बॅडमिंटन. चीन, जपान, मलेशिया, इंडोनेशिया व सिंगापूर या देशांमध्ये अनेक बॅडमिंटन चॅम्पियन तयार झाले. भारतात ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच राहिली. त्यातही भारतीय पुरुष बॅडमिंटनला फारसे हिरो लाभले नाहीत. ऑलिंपिक्समध्ये बॅडमिंटन खेळात भारताची शान राखली महिला बॅडमिंटनपटूंनीच. मात्र, पॅरिसमध्ये हे चित्र बदलताना दिसू शकते. हे चित्र बदलण्याची जबाबदारी ज्याच्याकडे आहे तो म्हणजे युवा लक्ष्य सेन.
भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूंची नावे घेतल्यास प्रकाश पादुकोण व पुलेला गोपीचंद ही दोन नावे सर्वात वर येतील. अलीकडच्या काळात पारूपल्ली कश्यप आणि किदंबी श्रीकांत यांनी अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, मोठ्या स्टेजवर त्यांना देखील अपयश आले. पॅरिसमध्ये चार पुरुष बॅडमिंटनपटू सहभागी होत आहेत. चिराग शेट्टी व सात्विकसाईराज ही जोडी पुरुष दुहेरीत तगडे आव्हान सादर करणार आहे. तर, पुरुष एकेरीत पहिल्यांदा ऑलिंपिक खेळायला जाणारे एच.एस प्रणॉय व लक्ष्य सेन असतील. त्यातही फक्त 22 वर्षाचा लक्ष्य हा जायंट किलर ठरू शकतो.
लक्ष्य हा उत्तराखंडच्या अलमोडा येथील. त्याचे आजोबा बॅडमिंटन खेळायचे. पुढे जाऊन लक्ष्यचे पिता डी.के सेन हे देखील राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळले. त्यामुळे त्याच्या रक्तातच हा खेळ होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे तो अगदी लहान वयात कोर्टवर उतरला होता. मोठा भाऊ चिराग याला नॅशनल सब ज्युनिअर स्पर्धा खेळताना पाहून त्याने देखील पुढे बॅडमिंटनपटू होण्याचा निश्चय केला.
वडील डी.के सेन यांच्या शिस्तीत व मार्गदर्शनात त्याच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. भारतीय बॅडमिंटनचे दिग्गज असलेल्या प्रकाश पादुकोण व विमल कुमार यांना त्याने आपल्या पहिल्याच ट्रायलमध्ये मध्ये प्रभावित केले. त्यांनी त्याला बेंगलोरला येण्याचे निमंत्रण दिले. लक्ष्यसाठी आजोबा आणि वडील यांनी अल्मोडा सोडले आणि थेट बेंगलोरला येऊन राहू लागले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
इथून खऱ्या अर्थाने त्याचा प्रवास आणि भारतातील सर्वात प्रतिभावान बॅडमिंटनपटू म्हणून त्याचे नाव घेतले जाऊ लागले. अंडर 13 पासून अंडर 19 पर्यंत सगळ्या वयोगटात त्याने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय स्तरावर 18 व्या वर्षी तो युथ ऑलिंपिकमध्ये सिल्वर मेडल जिंकण्यात यशस्वी ठरला. त्याच स्पर्धेत तो मिश्र दुहेरीत मात्र विजेता ठरलेला. पुढे ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप व जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील त्याच्या नावे मेडल आले.
लक्ष्य याने 2021 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आपले पहिले मेडल जिंकले. मात्र, खऱ्या अर्थाने त्याचे नाव झाले ते 2022 मध्ये. त्यावर्षी सगळ्याच स्पर्धांमध्ये त्याचा दबदबा राहिला. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने सुवर्णपदक आपल्या नावे केले. बॅडमिंटनचा वर्ल्डकप म्हटल्या जाणाऱ्या थॉमस कप स्पर्धेतही पुरुष एकेरीत विजय मिळवताना त्याने, भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकून देण्यात मदत केली. एशियन गेम्सचे सिल्वर त्याच्या खात्यात जमा झाले. मात्र, या सर्वावर कडी केली ती म्हणजे त्याने थेट ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिपची फायनल गाठून. एक्सेलसनने त्याला पराभूत केले मात्र, 20 व्या वर्षी यशाचे हे टोक गाठत त्याने आपण भविष्यातील सितारा असल्याचे सिद्ध केले.
लक्ष्य यावेळी प्रथमच ऑलिंपिक खेळण्यासाठी उतरतोय. तरीदेखील त्याच्याकडून सर्वांनी पदकाची अपेक्षा ठेवली आहे. मागील तीन वर्षात त्याने केलेल्या कामगिरीमुळेच देशवासीयांना देखील त्याच्यावर विश्वास निर्माण झाला. तो विश्वास सार्थ ठरवताना लक्ष्य गोल्डन स्मॅश मारून, पुरुष बॅडमिंटनची नवीन ओळख बनतो का? हे पाहावे लागणार आहे.
(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics Badminton Player Lakshya Sen)
अधिकचे वाचा-
Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?
पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| ‘देश की बेटी’ Vinesh Phogat यंदा देणार धोबीपछाड
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।