Breaking News

MPL 2024| मॅच फिनिश करण्यात ऋतुराजला अपयश, नाशिक टायटन्सचा पुणेरी बाप्पावर विजय

MPL 2024
Photo Courtesy: X/MPL

MPL 2024| महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2024) स्पर्धेतील दुसरा सामना सोमवारी (3 जून) पुणेरी बाप्पा आणि ईगल नाशिक टायटन्स (PBvENT) यांच्या दरम्यान खेळला गेला. एमसीए स्टेडियम गहुंजे येथे झालेल्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने 7 धावांनी विजय मिळवला. पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला हा सामना फिनिश करण्यात अपयश आले.

या सामन्यात प्रथम फलंदाजीचे संधी मिळाल्यानंतर नाशिक संघाचे सलामीवीर अर्शिन कुलकर्णी व मंदार भंडारी तिसऱ्या षटकातच माघारी परतले. त्यानंतर रोहित हाडके व हरी सावंत यांनी भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. त्यानंतर रणजीत निकम व अथर्व काळे यांनी 69 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अथर्व याने 37 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या बाजूने रणजीत निकम याने तुफानी फटकेबाजी करताना केवळ 34 चेंडूंमध्ये 65 धावा चोपल्या.‌ अखेरीस धनराज शिंदे व दिग्विजय देशमुख यांनी छोटे-छोटे योगदान देत संघाला 195 पर्यंत मजल मारून दिली.

या धावांचा पाठलाग करताना शुभम तैसवाल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पवन शहा, रोहन दामले व राहुल देसाई यांनी चांगली सुरुवात केली मात्र ते मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. एका बाजूने यश क्षीरसागर याने 40 धावा केल्या. तर, सुरज शिंदे यांनी 23 धावांचे योगदान सहाव्या क्रमांकावर आलेला कर्णधार ऋतुराज गायकवाड हा संघाला विजय मिळवून देईल असे वाटत होते. मात्र, 7 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असताना तो बाद झाला. त्याने 38 धावा केल्या. नाशिक संघासाठी मुकेश चौधरी व अर्शिन कुलकर्णी यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. सामनावीर पुरस्कार रणजीत निकम याला दिला गेला.

(MPL 2024| Eagle Nashik Titans Beat Puneri Bappa By 7 Runs Ruturaj Gaikwad Cant Finish)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *