
MPL 2024|एमपीएल 2024 स्पर्धेत गुरुवारी (13 जून) दुपारच्या सत्रात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व ईगल नाशिक टायटन्स (PBGKTvENT) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमसीए स्टेडियमवर (MCA Stadium) झालेल्या सामन्यात कोल्हापूर टस्कर्स संघाने विक्रमी 223 धावांचा यशस्वी पाठलाग केला. हा स्पर्धेतील सर्वात मोठा रनचेस ठरला. अनुभवी फलंदाज अंकित बावणे (Ankit Bawne) याने नाबाद 94 धावांची खेळी केली. तर, दुसऱ्या बाजूला अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) याची 97 धावांची नाबाद खेळी व्यर्थ ठरली.
𝐏𝐁𝐆 𝐊𝐎𝐋𝐇𝐀𝐏𝐔𝐑 𝐓𝐔𝐒𝐊𝐄𝐑𝐒, 𝐓𝐀𝐊𝐄 𝐀 𝐁𝐎𝐖! 🎉🎉🎉
They have successfully chased the highest target of 223 runs against ENT🤯#MaharashtraPremierLeague2024 #ThisIsMahaCricket #T20Cricket #KolhapurTuskers #EagleNashikTitans pic.twitter.com/OX28aUByQK
— MPLT20Tournament (@mpltournament) June 13, 2024
स्पर्धेतील या 21 व्या सामन्यात नाशिक संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मंदार भंडारी व अर्शिन कुलकर्णी यांनी 42 धावांची सलामी संघाला दिली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या साहिल पारख याने केवळ 21 चेंडूत 40 धावा केल्या. यादरम्यान कुलकर्णी याने आपले अर्धशतक पूर्ण केले. साहिल बाद झाल्यानंतर अथर्व काळे याने मैदानात येताच चौफेर फटकेबाजी सुरू केली. त्याने 19 चेंडूवर 45 धावा तडकावल्या. अर्शिन याने अखेरपर्यंत नाबाद राहत 57 चेंडूंमध्ये सात चौकार व सात षटकाऱ्या मदतीने 97 धावा केल्या. कोल्हापूर संघासाठी श्रेयस चव्हाण याने दोन बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या 223 धावांचा पाठलाग करताना अभिषेक पोरवाल केवळ नऊ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर अनुभवी अंकित बावणे व कर्णधार राहुल त्रिपाठी ही जोडी जमली. दोघांनी अवघ्या 40 चेंडूंमध्ये 83 धावांची भागीदारी केली. त्रिपाठी याने अवघ्या 20 चेंडूंमध्ये 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. यानंतर सचिन धस व सिद्धार्थ म्हात्रे लवकर बाद झाले. मात्र, अंकित याने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. त्याला योगेश डोंगरे (Yogesh Dongare) याने उत्कृष्ट साथ दिली.
योगेश यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत 29 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या. तर, अंकित याने 48 चेंडूंमध्ये 10 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 94 धावा कुटल्या. दोघांनी नाबाद 101 धावांची भागीदारी करत संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला.
(MPL 2024 PBGKT Chase 223 Against Eagle Nashik Titans Ankit Bawne Arshin Kulkarni Yogesh Dongare Shines)