MS Dhoni Retirement| आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये शनिवारी (18 मे) अत्यंत महत्त्वाचा सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्या दरम्यान होणाऱ्या या सामन्यातून स्पर्धेतील चौथा प्ले ऑफ संघ निश्चित होईल. भारतीय संघाचा माजी कर्णधार व चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासाठी हा अखेरचा सामना सिद्ध होण्याची शक्यता आहे. तब्बल दोन दशके आपल्या नेतृत्व व फलंदाजीने सर्वांची मने जिंकणाऱ्या धोनीला कदाचित लोक चिन्नास्वामी स्टेडियमवर अखेरच्या वेळी पाहू शकतात.
सध्या आयपीएल 2024 प्ले ऑफ्समध्ये तीन संघ पोहोचले आहेत. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद यांचा समावेश आहे. सीएसके विरुद्ध आरसीबी या सामन्यात सीएसकेचा 18 धावांनी पराभव झाल्यास अथवा आरसीबीने अधिक चेंडू राखून सामना जिंकल्यास आरसीबी प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करेल. त्यामुळे हा सामना धोनीच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो. वयाची 41 वर्ष पार केलेल्या धोनी या हंगामानंतर कोणतेही व्यावसायिक क्रिकेट खेळताना दिसण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे. चालू हंगामात देखील तो केवळ अखेरची काही षटके फलंदाजी करण्यासाठी येत आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास, या सामन्यात सीएसके ने एका धावेने विजय मिळवला अथवा 18 पेक्षा कमी धावांचे अंतर राखून त्यांचा पराभव झाला तरी ते प्ले ऑफ्समध्ये दाखल होतील. अशात त्यांना एलिमिनेटर सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळावा लागेल. त्यानंतर या सामन्यात विजय मिळवल्यास दुसऱ्या क्वालिफायरमध्ये ते आपल्या क्वालिफायर 2 आणि ती जिंकल्यास पुन्हा एकदा घरच्याच चेपॉक स्टेडियमवर अंतिम सामना खेळण्यासाठी उतरतील.
याखेरीज, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद यांना आपल्या अखेरच्या सामन्यात मोठा पराभव स्वीकारावा लागला तर, सीएसके थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचून घरच्या मैदानावर क्वालिफायर 1 व त्यानंतर अंतिम सामना खेळू शकते. चेन्नईने या स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यास धोनीच्या शानदार कारकिर्दीची अखेरही तितकीच दैदिप्यमान होईल.