![durand cup 2024](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/08/north-east.jpg)
Durand Cup 2024: भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या डुरंड कप (Durand Cup 2024) चा 133 वा हंगाम शनिवारी (31 ऑगस्ट) पार पडला. अंतिम सामन्यात गतविजेत्या मोहन बागान सुपरजायंट्स (Mohun Bagan Supergiants) संघासमोर प्रथमच कोणत्याही स्पर्धेची अंतिम फेरी खेळत असलेल्या नॉर्थ ईस्ट युनायटेड (North East United FC) चे आव्हान होते. पूर्ण वेळेत सामना 2-2 अशा बरोबरीत राहिल्यानंतर, पेनल्टी शूटआउटमध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेडने विजय मिळवला.
HISTORY! 🏆#StrongerAsOne #8States1United #IndianOilDurandCup pic.twitter.com/3msQAoXJ6G
— NorthEast United FC (@NEUtdFC) August 31, 2024
North East United FC Won 133th Durand Cup 2024
युवा भारती क्रिडांगण कोलकाता येथे झालेल्या या अंतिम सामन्यात घरच्या मैदानावर खेळत असलेल्या मोहन बागानने शानदार सुरुवात केली. जेसन कमिंग्स याने अकराव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करत संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर मोहन बागानचे सामन्यावर वर्चस्व दिसले. साहल अब्दुल समद याने पहिला हाफ संपण्यासाठी काही क्षण बाकी असताना मोहन बागानची आघाडी दुप्पट केली. पहिल्या हाफच्या अखेरीस मोहन बागान सुपरजायंट्सकडे 2-0 अशी आघाडी होती.
दुसऱ्या हाफमध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेड मात्र अधिक आक्रमक खेळताना दिसली. अराजेस याने 55 व्या मिनिटाला उत्कृष्ट मैदानी गोल करत पिछाडी भरून काढली. त्यानंतर अवघ्या तीनच मिनिटांनी सब्स्टिट्यूट आलेल्या गुलेर्मो याने उत्कृष्ट व्हॉली मारत नॉर्थ ईस्टला बरोबरी साधून दिली. त्यानंतर 90 मिनिटापर्यंत दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत व सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. पेनल्टी शूटआउटमध्ये मोहन बागान सुपरजायंट्सचे लिस्टन कोलासो व कर्णधार सुभाषिश बोस हे पेनल्टी सत्कारणी लावण्यात अपयशी ठरले. त्यामुळे नॉर्थ ईस्टने 4-3 असा विजय मिळवला.
स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा केरला ब्लास्टर्सचा नोहा सादीकू हा गोल्डन बूटचा मानकरी ठरला. फायनलमध्ये शानदार गोलकीपिंग करणाऱ्या गोलकीपर गुरमीत सिंग याने गोल्डन ग्लोव्हज जिंकले. तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला देण्यात येणारा गोल्डन बॉल नॉर्थ ईस्टच्या जीतीन एमएस याने पटकावला. नॉर्थ ईस्ट युनायटेडचे हे कोणत्याही मोठ्या स्पर्धेतील पहिलेच विजेतेपद आहे.
(North East United FC Won Durand Cup 2024)
Durand Cup 2024: मोहन बागान पुन्हा फायनलमध्ये! बीएफसी पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत