
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 साठी खास सुरू केलेल्या आपल्या ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार या सदराची दुसरी मानकरी आहे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu). सलग तिसऱ्या ऑलिंपिक्समध्ये मेडल जिंकून भारतीय क्रीडा इतिहासातील सर्वात यशस्वी क्रीडापटू होण्याची ऐतिहासिक संधी तिच्याकडे अगदी चालून आली आहे. तिचीच ही आजची कहाणी.
From dreaming to living the journey, now embarking on my third Olympics (time flies!). Each medal a symbol of relentless hard work and sacrifice 💪🙌
Continuously dreaming and living ❤️ pic.twitter.com/CH4xpHadZE
— Pvsindhu (@Pvsindhu1) April 23, 2024
(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024)
पुसरला वेंकट सिंधू म्हणजेच पीव्ही सिंधू. आंध्र प्रदेशचे असलेले पीव्ही रामण्णा आणि विजयवाड्याच्या विजया या व्हॉलीबॉलपटूंची सिंधू ही कन्या. 1986 सेऊल एशियन गेम्समध्ये ब्रॉंझ जिंकणाऱ्या भारतीय संघाचे रामण्णा सदस्य होते. त्यांच्या खेळातील या योगदानासाठी त्यांना 2006 मध्ये अर्जुन पुरस्कार देखील मिळाला. याच खेळ नसानसात असणाऱ्या दांपत्याच्या पोटी सिंधू हिने जन्म घेतला.
आई-वडिल आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू असले तरी सिंधू हिने बॅडमिंटन खेळण्याचा निर्णय घेतला. अगदी वयाच्या आठव्या वर्षीच तिच्या हातात रॅकेट आले होते. यामागे तिची प्रेरणा होते 2001 मध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियन प्रकाश पादुकोण. त्यांनाच आदर्श मानून ती कोर्टवर उतरली होती. वडील रेल्वेमध्ये नोकरीला असल्याने तिला बॅडमिंटनचे प्राथमिक धडे तिथेच मिळाले. मात्र, तिच्यातील स्पार्क पाहता लवकरच तिला हैदराबादच्या गोपीचंद अकॅडमीत पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला. इथूनच खरी सुरुवात झाली भारताच्या फुलराणीच्या प्रवासाची.
सिंधूने गोपीचंद यांची अकॅडमी जॉईन केल्यानंतर, खऱ्या अर्थाने भारताच बॅडमिंटन गाजवायला सुरुवात केली. अंडर 10 ते अंडर 15 या वयोगटांमध्ये तिची बरोबरी कोणी करू शकले नाही आणि तिने सर्वच्या सर्व राष्ट्रीय विजेतेपदे आपल्या नावे केली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली होते. इथे देखील तिचा प्रवास चढताच राहिला. 2012 मध्ये एशियन जूनियर चॅम्पियन होत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाणे खणखणीत वाजणार असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर पुढच्या वर्षी 2013 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन्समध्ये ब्रॉंझ जिंकत तिने इतिहास रचला. थेट आपले आदर्श असलेल्या प्रकाश पादुकोण यांच्यानंतर अशी कामगिरी करणारी ती केवळ दुसरी भारतीय होती. भारत सरकारने देखील तिच्यातील गुणवत्ता हेरत तिला त्यावर्षी अर्जुन पुरस्कार दिला.
सिंधूने 2014 मध्ये देखील वर्ल्ड चॅम्पियनशिपचे मेडल आणले. मात्र, 2015 वर्ष तिच्यासाठी तितके लाभदायी ठरले नाही. दरम्यान तिला दुखापत देखील झाली. तरीही 2016 रिओ ऑलिंपिक्सला पात्र ठरण्यात तिला यश आले. ही ऑलिंपिक भारतासाठी तितकी लाभदायी ठरली नाही. भारताला फक्त दोन मेडल इथे मिळाले त्यातील एक होते सिंधूचे सिल्वर. तिला स्पर्धेत फक्त स्पेनची कॅरोलीना मरीन हीच आव्हान देणारी होती. फायनलमध्ये तिने सिंधूचा पराभव केला. तरीही ऑलिंपिक्स इतिहासात भारताला रौप्य पदक मिळवून देणारी ती पहिली महिला ठरली. तिच्या याच यशाचा गौरव म्हणून भारत सरकारने सर्वात प्रतिष्ठेचा खेलरत्न पुरस्कार तिला बहाल केला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
सिंधूचा अश्वमेध यानंतरही असाच उधळलेला राहिला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये बहुप्रतिक्षित गोल्ड 2019 मध्ये तिने जिंकले. त्याआधी 2018 कॉमनवेलच गोल्ड ही तिने भारताच्या खात्यात टाकलेलं. एशियन गेम्सचे सिल्वर तिच्या नावे आले. पुढे वर्षभर तिची कामगिरी चांगलीच राहिली. मात्र, 2020 मध्ये पूर्ण वर्ष कोविडमुळे कोणत्याही स्पर्धा झाल्या नाहीत. असे असले तरी तिने सरावात जराही कमी केली नाही व ऑलिंपिक्ससाठी आपली तयारी सुरूच ठेवली.
टोकियो ऑलिंपिक्समध्ये तिला सहावे मानांकन मिळाले होते. मात्र, तिने कामगिरी पुन्हा एकदा अव्वल केली. सेमी फायनलमध्ये पराभूत झाली तरी तिने भारतासाठी ब्रॉंझ नक्की केले होते. भारताच्या क्रीडा इतिहासातील एकमेव महिला जिने सलग दोन ऑलिंपिक्समध्ये मेडल आणलेले. पुढच्या वर्षी बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्ये देखील ती गोल्ड जिंकण्यापासून दूर राहिली नाही.
मागच्या काही काळापासून सिंधू थोडी दुखापतींशी झगडत आहे. तिचा फॉर्मही म्हणावा तसा नाही. मात्र, ऑलिंपिक्स आले की तिच्यात वेगळाच जोश संचारतो. आणि हाच जोश भारताला मेडल जिंकण्यात कामी येतो. यावेळी सर्व भारतीयांना पॅरिसमध्ये सिंधूने ऑलिंपिक मेडल्सची हॅट्रिक करावी असे मनोमन वाटत आहे. ती देखील देशवासियांची ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपले शंभर टक्के प्रयत्न करणार, यात शंकाच नाही.
(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 PV Sindhu)
Paris Olympics 2024 मध्ये हे शिलेदार वाढवणार महाराष्ट्राचा मान! मेडलचेही आहेत दावेदार
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।