Breaking News

आरसीबी की पंजाब ? कोणाचा वनवास संपणार? वाचा IPL 2025 Final बद्दल सर्वकाही

ipl 2025 final
Photo Courtesy; X

IPL 2025 Final: आयपीएल 2025 (IPL 2025) चा अंतिम सामना (IPL 2025 Final) मंगळवारी (3 जून) खेळला जाणार आहे. साखळी फेरीत पहिल्या दोन स्थानी राहिलेल्या आरसीबी व पंजाब किंग्स (RCB v PBKS) यांच्या दरम्यान ही लढत होईल. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे यावेळी आयपीएलला नवा विजेता मिळेल. या अंतिम सामन्या वषयी आपण सर्वकाही जाणून घेऊ.

IPL 2025 Final Preview

गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिलेल्या पंजाब किंग्सला पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीने पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाबने मुंबईचे आव्हान मोडीत काढत फायनलमध्ये प्रवेश केला. दोन्ही संघ आतापर्यंत या प्रतिष्ठित स्पर्धेची ट्रॉफी उंचावू शकले नाही. त्यामुळे यावेळी एका संघाचा 18 वर्षांचा वनवास नक्की संपुष्टात येईल.

हा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मंगळवारी पावसाची शक्यता नसली तरी, वातावरण अंशता ढगाळ राहू शकते. या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या 220 आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात देखील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होताना पाहता येईल. दोन्ही संघाच्या गोलंदाजीचा विचार करता, 200 धावा धावफलकावर लागताना दिसू शकतात.

आरसीबीची मदार या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा त्यांची सलामीची जोडी विराट कोहली व फिल सॉल्ट यांच्यावर असेल. मधल्या फळीत कर्णधार रजत पाटीदार व उपकर्णधार जितेश शर्मा हे संघाला मजबुती देतील. टीम डेव्हिड तंदुरुस्त असल्यास तो रोमारिओ शेफर्ड याच्यासह फिनिशर म्हणून संघात खेळेल. गोलंदाजी अनुभवी फिरकीपटू कृणाल पांड्या व युवा सुयश शर्मा फिरकीची बाजू सांभाळतील. वेगवान गोलंदाजीत जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार व यश दयाल ही तिकडी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसते.

पंजाब संघाचा सर्वात प्रमुख आधारस्तंभ कर्णधार श्रेयस अय्यर आहे. त्याच्या जोडीला युवा सलामीवीर प्रभसिमरन व प्रियांश आर्या दिसून येतील. पंजाबची फलंदाजी आठव्या क्रमांकापर्यंत मजबूत भासते. यामध्ये जोश इंग्लिस व मार्कस स्टॉयनिस यांच्या अनुभवासोबत शशांक सिंग आणि नेहल वढेरा हे विश्वासू फलंदाज उपलब्ध असतील. अष्टपैलू ओमरजाई, कायले जेमिसन व अर्शदीप वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल संघाला मजबुती प्रदान करेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स व जिओ हॉटस्टार येथे सामन्याचे प्रक्षेपण होणार आहे.

IPL 2025 Final Preview

हे देखील वाचा: Glenn Maxwell ची वनडेतून तडकाफडकी निवृत्ती, आता केवळ टी20 खेळणार, अशी राहिली कारकिर्द