जागतिक टेनिसमधील माजी अग्रमानांकित टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याने आगामी फ्रेंच ओपन (French Open 2024) स्पर्धेसाठी आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. रोम येथे सुरू असलेल्या इटालियन ओपन (Italian Open 2024) स्पर्धेत त्याने पहिल्या फेरीत संघर्षपूर्ण विजय मिळवला.
आतापर्यंत तब्बल 22 ग्रॅंडस्लॅम जिंकलेल्या नदालने इटालियन ओपनच्या पहिल्या फेरीत 108 व्या मानांकित बेल्जियमच्या झिझो बर्ग याच्यावर 4-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये पराभूत झाल्यानंतर त्याने हा विजय आपल्या नावे केला. आतापर्यंत त्याने दहा वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे.
सध्या 37 वर्षाचा असलेला नदाल मागील काही काळापासून दुखापतींशी झुंज देत आहे. असे असले तरी पुढील महिन्यात होत असलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत त्याच्याकडे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत तब्बल 14 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा आपल्या नावे केली आहे. नदाल चालू वर्षाच्या हंगामानंतर व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होऊ शकतो.