Rahul Dravid : भारतचा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) हा क्रिकेटमधील ‘जंटलमन’ म्हणून ओळखला जातो. त्याचा शांत स्वभाव, लोकांना मदत करण्याची वृत्ती हीच त्याची ओळख आहे. बऱ्याचदा मैदानावर आणि मैदानावरही त्याच्या या स्वभावाचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. द्रविड नेहमीच त्याच्या जंटलमन वृत्तीने क्रिकेटरसिकांची मने जिंकत असतो. आताही त्याच्या अशाच एका कृतीने सर्वांना त्याचे गुणगान गायला भाग पाडले आहे.
माजी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड याने त्याच्या सहकाऱ्यांसाठी मोठा त्याग केला आहे. द्रविडने बीसीसीआयकडून मिळणारी मोठी बोनस रक्कम नाकारली असून त्याच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत.
त्याचे झाले असे की, द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने 17 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकला. या घवघवीत यशासाठी द्रविडचे आणि भारतीय संघाचे तोंडभरुन कौतुक झाले. अनेकांनी त्यांच्यावर बक्षिसाचा वर्षाव केला. बीसीसीआयनेही विश्वविजेत्या भारतीय संघासाठी 125 कोटी बक्षिस म्हणून दिले. बक्षिसाची ही रक्कम भारतीय क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफमध्ये विभागण्यात आली. 125 कोटी रुपयांची विभागणी करताना सर्व खेळाडूंना 5 कोटी भेटतील तर प्रशिक्षकांना प्रत्येकी अडीच कोटी मिळतील. मात्र मुख्य प्रशिक्षक असल्याने राहुल द्रविड यांना 5 कोटी देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. तर इतर सहाय्यक प्रशिक्षकांना 2.5 कोटी रुपये मिळणार होते.
परंतु द्रविड यांनी बीसीसीआयचा हा निर्णय नाकारला. भारताला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस महांब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांना व आपल्याला समान रक्कम मिळावी, अशी विनंती बीसीसीआयकडे केली असल्याचे समजत आहे. द्रविडने 5 कोटी नाकारुन आपल्या इतर सहकाऱ्यांप्रमाणे आपल्यालाही 2.5 कोटी बोनस रक्कम देण्यात यावी, असे म्हटल्याचे समजत आहे.