Breaking News

SAvPAK: दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! थरारक सामन्यात पाकिस्तानला नमवत गाठली WTC ची फायनल

SAVPAK
Photo Courtesy: X

SAvPAK: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान (SAvPAK) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दोन गडी राखून थरारक विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) आपली जागा निश्चित केली. कगिसो रबाडा व मार्को जेन्सन यांनी केलेली नाबाद अर्धशतकी भागीदारी निर्णायक ठरली.

(SAvPAK South Africa Entered In WTC Final 2025)

सेंचुरियन येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या डावात विजयासाठी 148 धावांची गरज होती. तिसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा त्यांनी केवळ 27 धावांमध्ये आपले तीन प्रमुख फलंदाज गमावलेले. चौथ्या दिवशी ऐडन मार्करम व कर्णधार टेंबा बवुमा यांनी संघाला 62 पर्यंत पोहोचवले. मार्करम 37 धावा करून बाद झाला. त्यानंतर बवुमा याने काही फटके खेळत संघाला 100 च्या दिशेने नेले.

संघ चार बाद 96 अशाच चांगल्या स्थितीत असतानाच नसीम शहा व मोहम्मद अब्बास यांनी केवळ तीन चेंडूंमध्ये चार बळी मिळवत पाकिस्तानला सामन्यात पुढे केले. यादरम्यान अब्बास याने सहा बळींचा टप्पा पूर्ण केला. पहिला सत्रातील उर्वरित पाच षटके खेळून काढत रबाडा व जेन्सन यांनी आपल्या संघाला सामन्यात जिवंत ठेवले. लंचनंतर शिल्लक असलेल्या 34 धावा अत्यंत आक्रमकपणे काढत रबाडा व जेन्सन जोडीने संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. रबाडाने नाबाद 31 तर जेन्सनने नाबाद 16 धावा केल्या. पहिला डावात शानदार 89 धावांची खेळी करणाऱ्या ऐडन मार्करम याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

या सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिका डब्ल्यूटीसी फायनल 2025 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ते पराभूत झाले तरी, ते अंतिम सामन्यात खेळतील. अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे भारत व ऑस्ट्रेलिया यापैकी एकाचे आव्हान असेल.

(SAvPAK South Africa Entered In WTC Final 2025)