2024 T20 World Cup|आयपीएल 2024 चा रणसंग्राम संपल्यानंतर लगेचच टी20 विश्वचषकाचा थरार सुरू होणार आहे. यूएसए आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या या विश्वचषकात 20 संघ सहभागी होतील. त्यापैकी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान (INDvPAK) यांच्यातील सामना 9 जून रोजी खेळला जाईल. न्यूयॉर्क येथे होणाऱ्या या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र, त्याआधीच आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी (Lalit Modi) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
न्यूयॉर्क येथील नॅसू काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम येथे हा सामना होणार आहे. अमेरिकेत प्रथमच भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान क्रिकेटचा सामना होणार असल्याने तिकिटांसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या स्टेडियमची आसनक्षमता केवळ 34,000 आहे. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट घेण्याचा प्रयत्न क्रिकेटप्रेमी करताना दिसतायेत.
https://twitter.com/LalitKModi/status/1793422859832017012?t=OXxQ521dw_FaAx6XvKlhTw&s=19
या सर्व गोष्टी असतानाच ललित मोदी यांनी एक एक्स पोस्ट करत आयसीसीला धारेवर धरले. काही स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी म्हटले,
‘हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला की, आयसीसी टी20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याचे डायमंड क्लबचे तिकीट तब्बल वीस हजार डॉलर्सना (भारतीय चलनात 16 लाख रुपये) विकत आहे. युएसमध्ये होणारा विश्वचषक हा क्रिकेटची वाढ आणि लोकप्रियता वर नेण्यासाठी आहे. गेट कलेक्शनमधून तुम्ही फायदा पाहू नका. 2750 डॉलरचे तिकीट क्रिकेट नव्हे.’
दुसरीकडे, आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर भारत-पाकिस्तान सामन्याच्या सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत 300 डॉलर्स आहे. तर डायमंड क्लबचे तिकीट 10,000 डॉलर्सना दिसून येते. त्यामुळे ललित मोदी यांनी केलेले आरोप सध्यातरी निराधार वाटत आहेत.
(T20 World Cup INDvPAK Ticket Price So High Lalit Modi Raised Questions)