Breaking News

WTC Final 2025 Day 2: दुसऱ्या दिवशीच सामना रंगतदार अवस्थेत, ऑस्ट्रेलियाचे पारडे किंचित जड

wtc final 2025 day 2
Photo Courtesy: X

WTC Final 2025 Day 2: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपली पकड अधिक मजबूत केली. कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने टिपलेल्या सहा बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 74 धावांची निर्णायक आघाडी मिळवली. त्यानंतर प्रमुख फलंदाजांनी दुसऱ्या डावात काहीसा आतातायीपण केला. मात्र, खालच्या फळीतील फलंदाजांनी संघर्ष करत ‌ ऑस्ट्रेलिया संघाला सामन्यात आणखी पुढे केले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा ही मानाची गदा उंचावण्यासाठी प्रयत्न करेल.

WTC Final 2025 Day 2 Updates

पहिल्या दिवशीच्या 169 धावांच्या पिछाडीवरून सुरुवात करताना दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार बवुमा व बेडिंगम या जोडीने महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी रचली. बवुमाने शानदार 36 धावा बनवल्या. मार्नस लाबुशेन याने एक अफलातून झेल पकडत त्याची खेळी संपवली. त्यानंतर वेरान 13 धावांचे योगदान देऊ शकला. मोठा संघर्ष केलेल्या बेडिंगम याची खेळी 45 धावांवर कमिन्सने थांबवली. अखेरचे फलंदाज विशेष योगदान न देऊ शकल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव 138 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार कमिन्सने 28 धावांवर 6 गडी गारद केले. या दरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळींचा टप्पा पार केला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 74 धावांची आघाडी मिळाली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

पहिल्या डावात मिळालेल्या आघाडी वाढवून दक्षिण आफ्रिकेला सामन्यातून बाहेर करण्याचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा मनसुबा होता. मात्र, कगिसो रबाडा याने त्यांच्या या योजनेला सुरुंग लावला. उस्मान ख्वाजा व कॅमेरून ग्रीन यांना पुन्हा एकदा एकाच षटकात बाद करत त्याने संघाला दोन धक्के दिले. त्यानंतर यान्सनने लाबुशेन व एन्गिडीने अनुभवी स्टीव्ह स्मिथ यांना तंबूचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाची अवस्था यावेळी 4 बाद 48 अशी झाली.

WTC Final 2025 Day 2 Updates

एन्गिडी‌ व मलडर यांनी आपल्या गोलंदाजीची धार आणखी वाढवत, पहिल्या डावातील अर्धशतकवीर वेबस्टरसह ट्रेविस हेड व कर्णधार पॅट कमिन्स यांना देखील बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था 7 बाद 73 इतकी दयानीय केली. दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाला लवकर बाद करेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, संकटमोचक म्हणून नेहमी मदतीला धावणाऱ्या यष्टीरक्षक एलेक्स केरी याने संघाची जबाबदारी घेतली. त्याने 50 चेंडूतच आक्रमक 43 धावा करत, ऑस्ट्रेलियाला 200 च्या पलीकडची आघाडी मिळवून दिली. बाद होण्यापूर्वी त्याने मिचेल स्टार्कसह 61 धावांची अतिमहत्वपूर्ण भागीदारी रचली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्टार्क 16 व नॅथन लायन एका धावेवर नाबाद होता. सध्या ऑस्ट्रेलियाकडे 218 धावांची आघाडी आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एन्गिडी व कगिसो रबाडा यांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन बळी मिळवले आहेत.

हे देखील वाचा: WTC Final 2025 Day 1: पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा! वेबस्टर-स्मिथनंतर गोलंदाजांची कमाल