आयपीएल 2024 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने सनरायझर्स हैदराबादवर मात केली. यासह केकेआरने अंतिम फेरीत प्रवेश केला. संपूर्ण हंगामात केकेआरने उत्तम सांघिक खेळ दाखवत इथपर्यंत मजल मारली आहे. असे असताना मैदानाबाहेर केकेआरचा मेंटर गौतम गंभीर याचे देखील मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. विशेष म्हणजे संघासोबत जोडले गेल्यानंतर गंभीरने स्वतः यावर्षी आपण अंतिम सामना खेळणार असल्याचे म्हटले होते.
मागील दोन वर्ष लखनऊ सुपरजायंट्स संघाचा मेंटर असलेल्या गंभीरने त्या संघाला दोन वेळा प्ले ऑफ्समध्ये पोहोचवले होते. यंदा तो केकेआर संघाकडे आला. यापूर्वी गंभीर 2011 ते 2017 या काळात केकेआर संघाचा कर्णधार राहिला होता. त्याच्या नेतृत्वात संघाने दोन वेळा ही स्पर्धा देखील जिंकलेली. त्यामुळे केकेआरचा संघमालक शाहरुख खान याच्या आग्रहास्तव गंभीर पुन्हा एकदा नव्या जबाबदारीसह केकेआरचा भाग बनला.
GAUTAM GAMBHIR SPEECH BEFORE IPL 2024.
– He said KKR should be there on 26th May and they're playing the Final. 🏆pic.twitter.com/1xT3SOjEy3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 21, 2024
हंगाम सुरू होण्याआधी केकेआरचा कॅम्प लावला गेलेला. यामध्ये आपल्या पहिल्याच सत्रात गंभीरने खेळाडूंना प्रोत्साहित केलेले. त्यावेळी तो बोलताना म्हणालेला,
“या संघातील प्रत्येक खेळाडूसोबत एकसारखाच व्यवहार केला जाईल. इथे कोणीही आंतरराष्ट्रीय खेळाडू नसेल किंवा कोणीही डोमेस्टिक खेळाडू नसेल. कोणी सीनियर नसणार किंवा कोणी ज्युनिअर नसणार. आपले एकच लक्ष आहे आयपीएल जिंकण्याचे. प्रत्येकाला याच वाटेने जायचे आहे आणि आपण 26 मे रोजी अंतिम सामना खेळायचा आहे. याची सुरुवात आज आता होईल.”
केकेआर संघाने या हंगामात नऊ सामने जिंकताना प्ले ऑफ्समध्ये प्रवेश केला होता. सुनील नरीन व फिल सॉल्ट या सलामी जोडी सोबतच मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रमनदीप सिंग व आंद्रे रसेल यांनी योगदान दिले. सोबतच गोलंदाजीत मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती व वैभव अरोडा यांनी मोलाचे योगदान दिले.
(Gautam Gambhir Gives Motivational Talk Before KKR Season Starts)