Breaking News

VIDEO: विश्वविजेती Team India भारतभूमीवर! दिल्लीकरांनी केले ढोल-नगाड्यांनी स्वागत, खेळाडूंनी धरला ताल

team india
Photo Courtesy: X

Team India Arrived In India: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजेत्या भारतीय संघाचे अखेर पाचव्या दिवशी मायदेशात आगमन झाले. दिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर भारतीय संघ पहाटे 4.30 वाजता दाखल झाला. त्यानंतर क्रिकेटप्रेमींनी संघाचे जोरदार स्वागत केले.

बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे संघाला भारतात येण्यास उशीर झाला. एअर इंडियाच्या खास विमानाने भारतीय संघासह, पदाधिकारी व काही पत्रकार भारतात दाखल झाले. पहाटे 4.30 वाजता भारतात पोहोचल्यानंतरही मोठ्या संख्येने चाहते स्वागतासाठी उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात भारतीय संघाचे स्वागत केले गेले.

विमानतळापासून भारतीय संघ आयटीसी मोर्या हॉटेलपर्यंत जात असताना अनेकांनी भारतीय संघाला अभिवादन केले. हॉटेलवर पोहोचल्यानंतर देखील चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बसमधून उतरल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने सर्वांना ट्रॉफीचे दर्शन दिले. त्याने सूर्यकुमार यादव व यशस्वी जयस्वाल यांच्यासह ढोलाच्या ठेक्यावर ताल धरला. उपकर्णधार हार्दिक पंड्या हा देखील नाचताना दिसला‌. ‌तर विराट कोहली याने केवळ चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला.

आता भारतीय संघ यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. संघ त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट करेल. यानंतर भारतीय संघ मुंबईकडे रवाना होणार आहे. मुंबई येथील नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम या दोन किलोमीटर अंतरामध्ये भारतीय संघाचे विजयी मिरवणूक होईल. या मिरवणूकीनंतर वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंना सन्मानित करण्यात येईल.

(Team India Arrived In India After Winning T20 World Cup)