Breaking News

Mohammed Siraj याला घर आणि सरकारी नोकरी मिळणार, तेलंगणा सरकारची घोषणा

Mohammed Siraj : वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंचे भारतात जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुंबईतील विजयी यात्रेनंतर खेळाडू आपापल्या घरी परतले असून यावेळीही त्यांचे स्वागत करण्यात आले. यादरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नुकतीच गोलंदाज सिराजची भेट घेतली. यावेळी त्यांनी सिराजला सरकारी नोकरी आणि घर देण्याची घोषणा केली आहे.

खरे तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोहम्मद सिराजची भेट घेऊन भारतीय संघाच्या विश्वचषक विजयाबद्दल त्याचे अभिनंदन केले. यासोबतच त्याला सरकारी नोकरीची देण्याचीही घोषणा केली. हैदराबादमध्ये घर बांधण्यासाठी सिराजला जमीनही देऊ केली आहे. यावेळी सिराजने मुख्यमंत्र्यांना भारतीय संघाची जर्सी भेट दिली. सिराज आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनही उपस्थित होता. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दरम्यान मोहम्मद सिराज हा मूळचा तेलंगणाचा आहे. भारतीय संघापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. सिराजच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर ती शानदार राहिली. सिराजने भारतासाठी 41 वनडे सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 68 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 27 कसोटी सामन्यात 74 विकेट्स घेतले आहेत. सिराजने भारतासाठी 13 टी20 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत.