Breaking News

मानलं! चाहत्यांचा तिरस्कार, निवडीवर प्रश्नचिन्ह; आज तोच Hardik Pandya ठरला टी20 विश्वविजयाचा नायक

Hardik Pandya: भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक विजयाचा दुष्काळ अखेर संपवला. 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. या दिवशी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजयश्री पटाकवली. 2007 नंतर भारताने पहिल्यांदाच टी20 विश्वचषक जिंकला आहे. भारताच्या या विजयात मोलाचा वाटा राहिला तो अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याचा. 

हार्दिकसाठी तसा हा टी20 विश्वचषक प्रचंड आव्हानांनी भरलेला होता. कारण विश्वचषकाच्या केवळ दोन महिन्यांपूर्वीच हार्दिक भारतीय क्रिकेटचाहत्यांच्या निशाण्यावर होता. आयपीएल 2024 च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने लोकप्रिय कर्णधार रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवून हार्दिकचा नवा संघनायक म्हणून निवड केली होती. फ्रँचायझीच्या या निर्णयामुळे संपूर्ण हंगामात हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. याशिवाय त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबईचा संघ 14 पैकी  10 सामने गमावून सर्वात आधी स्पर्धेतून बाहेरही पडला.

आयपीएलमधील या अत्यंत निराशाजनक प्रदर्शनानंतर हार्दिकची टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली. त्याच्याकडे संघाच्या उपकर्णधारपदाचीही जबाबदारी सोपवली गेली. त्यावेळी अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी हार्दिकच्या भारतीय संघातील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु हार्दिकने न खचता स्वत:ला सिद्ध करुन दाखवले.

त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 3 षटकांत 20 धावा देत 3 अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट्स काढल्या. तसेच टी20 विश्वचषक 2024 च्या हंगामात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज आहे. त्याने 8 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय बॅटनेही त्याने संघाच्या विजयात भरीव योगदान दिले आहे. फिनिशरची भूमिका निभावताना 8 सामन्यात 151 च्या स्ट्राईक रेटने त्याने 144 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *