T20 World Cup, IND vs USA :- भारत विरुद्ध यजमान अमेरिका संघात आज (१२ जून) न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी२० विश्वचषक २०२४ मधील २५ वा सामना रंगणार आहे. या सामन्यात उभय संघात काट्याची टक्कर पहायला मिळू शकते. दोन्हीही संघ विजयरथावर स्वार असून त्यांनी आतापर्यंत खेळलेले दोन्हीही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ सुपर-८ फेरीचे तिकीट मिळवू शकतो. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (IND vs USA Playing Xi) काही बदल करू शकतो.
दुबेचा पत्ता कटू शकतो!
फलंदाजीसाठी अवघड असलेल्या न्यूयॉर्कच्या मैदानावर शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळू शकते. त्याचबरोबर यशस्वी जयस्वालही संघात स्थान मिळवू शकतो. वास्तविक, दुबे गेल्या दोन सामन्यांत काही विशेष पराक्रम दाखवू शकला नाही. त्याला आयर्लंडविरुद्ध एकही धाव करता आली नाही तर पाकिस्तानविरुद्ध तो केवळ तीन धावा करून बाद झाला. त्यामुळे लयीत नसलेल्या या फलंदाजाला कर्णधारच बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. आतापर्यंत दुबेला गोलंदाजीची संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या जागी एका विशेषज्ञ फलंदाजाचा समावेश केला जाऊ शकतो.
यशस्वी जयस्वालचे पुनरागमन शक्य
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शिवम दुबेच्या जागी यशस्वी जयस्वालचे नाव आघाडीवर आहे. तो एक उत्तम सलामीवीर आहे. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहली संघाची सलामी देत आहेत. अशा स्थितीत जयस्वाल तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याची शक्यता आहे. तर यष्टीरक्षक रिषभ पंत चौथ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. त्याचवेळी हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात खेळताना दिसतील जे चेंडू तसेच बॅटनेही उपयुक्त ठरत आहेत.
गोलंदाजी फळीत कोणताही बदल होणार नाही
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताच्या वेगवान गोलंदाजी फळीने दमदार कामगिरी केली आहे. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये घातक गोलंदाजी केली आहे. बुमराहने पाकिस्तानविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या होत्या. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्याचवेळी अर्शदीपला एक आणि हार्दिक पांड्याला दोन विकेट मिळाल्या. अक्षर पटेलनेही या सामन्यात उस्मानच्या रूपाने विकेट घेतली. मात्र, सिराजला यश मिळाले नाही. पण वेगवान गोलंदाजाने चार षटकांच्या स्पेलमध्ये ४.७५ च्या इकॉनॉमी रेटने केवळ १९ धावा दिल्या. अशा स्थितीत गोलंदाजी आक्रमणात कोणत्याही बदलाची शक्यता दिसत नाही.
भारत आणि अमेरिका संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अमेरिका: स्टीव्हन टेलर, मोनांक पटेल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अँड्रिज गौस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नोस्तुश केन्झिगे, सौरभ नेत्रावलकर, अली खान.