Breaking News

इतिहास घडला! CAFA Nations Cup 2025 मध्ये भारत तिसरा! अनुभवी ओमानला चारली धूळ

cafa nations cup 2025
Photo Courtesy: X

CAFA Nations Cup 2025: नवे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील (Khalid Jamil) यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय फुटबॉल संघाने इतिहास नोंदवला आहे. उझबेकिस्तान व ताजिकिस्तान येथे झालेल्या काफा नेशन्स कप 2025 स्पर्धेत भारताने तिसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेला लढतीत भारताने अनुभवी ओमानला पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 असे पराभूत केले. भारताच्या फुटबॉल इतिहासातील हा मोठा विजय मानला जातोय. विशेष म्हणजे फिफा क्रमवारीत 133 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने आपले दोन्ही विजय सरस संघांविरुद्ध नोंदवले.

India Beat Oman In CAFA Nations Cup 2025

मलेशियाच्या माघारीमुळे या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळालेला भारतीय संघाने शानदार कामगिरी करून दाखवली. आपल्या गटात दुसऱ्या क्रमांकावर राहत भारताने तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात प्रवेश मिळवला होता. या सामन्यात जागतिक क्रमवारीत 79 व्या स्थानावरील ओमानचा त्यांना सामना करावा लागला. पूर्ण वेळ आणि त्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता. पूर्ण वेळेत भारतासाठी उदांता सिंग याने 80 व्या मिनिटाला गोल करत भारताला बरोबरी साधून दिली होती.

पेनल्टी शूटआउटमध्ये भारतासाठी पेनल्टी शूटआउटमध्ये लालियनझुआला छांगते, राहुल भेके व जितिन एमएस यांनी नेटचा वेध घेतला. तर, अन्वर अली व उदांता यांना गोल करण्यात अपयश आले. भारतीय कर्णधार व गोलकिपर गुरप्रित सिंग संधू (Gurpreet Singh Sandhu) याने दोन गोल वाचवले.

सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात 106 व्या मानांकित ताजिकिस्तानला 2-1 असे पराभूत केले होते. त्यानंतर इराणकडून संघाला 3-0 असा पराभव पत्करावा लागला. तर, तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध भारत केवळ बरोबरी करू शकला. सरस गोल फरकामुळे गटात दुसऱ्या स्थानी राहिल्याने भारताला हा सामना खेळण्याची संधी मिळाली होती. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इराण व उझबेकीस्तान खेळतील.

( Latest Sports News In Marathi)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: जमील पर्वाची सनसनाटी सुरूवात! CAFA Nations Cup 2025 च्या पहिल्याच सामन्यात मिळवला विजय