Breaking News

ISL 10| मुंबई सिटी एफसी दुसऱ्यांदा ISL चॅम्पियन! मोहन बागान सुपर जायंटचा घरच्या मैदानावर पराभव

Mumbai City FC Won ISL 2024 Best Mohun Bagan Super Giant

भारतातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या इंडियन सुपर लीग म्हणजेच आयएएसएल (ISL) स्पर्धेचा अंतिम सामना (ISL Final) शनिवारी (४ मे) खेळला गेला.‌ कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई सिटी एफसीने (Mumbai City FC) घरच्या मैदानावर खेळत असलेल्या मोहन बागान सुपर जायंटचा (Mohun Bagan Super Giant) 3-1 असा पराभव केला. यासह मुंबई सिटी दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरली.

अकरा संघांच्या या स्पर्धेमध्ये मुंबईने साखळी फेरीत अव्वलस्थान पटकावत शिल्ड जिंकली होती. त्यानंतर त्यांचे लक्ष विजेतेपदाकडे होते. तब्बल 62,000 प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये उपस्थित झालेले. मात्र, मुंबईने या प्रेक्षकांचा हिरमोड करत कोलकत्यातील स्थानिक संघ असलेल्या मोहन बागानला मुसंडी मारू दिली नाही. मुंबईसाठी जॉर्ज डायस, बिपिन सिंग व जाकूब वोडजस यांनी गोल केले. तर मोहन बागानसाठी एकमेव गोल जेसन कमिंग याने नोंदवला. मुंबईने 2020-2021 हंगामाची पुनरावृत्ती करत पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले. आता त्यांच्याकडे प्रत्येकी दोन शिल्ड व दोन विजेतेपदे जमा आहेत.

या स्पर्धेचे आतापर्यंत दहा हंगाम खेळले गेले असून, ऍटलेटिको डी कोलकाता, चेन्नयियन एफसी व मुंबई सिटी एफसी यांनी प्रत्येकी दोन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर बेंगलोर एफसी, एटीके, मोहन बागान सुपर जायंट व हैदराबाद एफसी यांना प्रत्येकी एकदा ट्रॉफी उंचावण्याची संधी मिळालेली. या स्पर्धेची शिल्ड जिंकणाऱ्या संघाला थेट एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्याची संधी मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *