
Paris Olympics 2024: जगातील खेळांचा कुंभमेळा असलेल्या ऑलिंपिक्स खेळांना 26 जुलैपासून पॅरिस (Paris Olympics 2024) येथे सुरुवात होत आहे. टोकियो ऑलिंपिक्समध्ये (Tokyo Olympics 2020) भारतीय पथकाने आपल्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करत, 7 पदके जिंकण्यात यश मिळवले होते. त्यानंतर आता पॅरिसमध्ये थेट त्यापेक्षा दुप्पट पदके मिळवण्याचे लक्ष भारतीय पथकाने ठेवले आहे. त्याच 15 अव्वल पदकांच्या दावेदारांबाबत आपण ‘ ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार’ (Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024) या सदराखाली माहिती घेणार आहोत.
आपल्या या मालिकेतील पहिलाच दावेदार आहे, टोकियो ऑलिंपिक्समध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra). आजवरच्या इतिहासात कोणत्याच भारतीय खेळाडूने ट्रॅक अँड फील्ड प्रकारात ऑलिंपिक मेडल जिंकले नव्हते. मात्र, नीरज याने मागील सर्व अपयश भरून काढत, थेट सुवर्ण फेक केलेली. पॅरिसमध्ये देखील त्याच्याकडून समस्त देशवासियांना हीच अपेक्षा राहील.
Paris Olympics 2024
Throwback to a historic day in Indian Athletics. Neeraj Chopra 🇮🇳 clinches gold 🥇 with his 87.58 M throw with his Javelin at Tokyo Olympics 2020. India's 1st ever gold in Olympic history of Athletics. pic.twitter.com/fj8NHIPYqe
— 𝙋𝙧𝙖𝙩𝙮𝙪𝙨𝙝 𝙎 (@ps26_11) August 7, 2023
नीरज मूळचा हरियाणातील खांदरा येथील. लहानपणी नीरजचे वजन काहीसे जास्त होते. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला जिम्नॅस्टिक क्लास लावले. त्याला त्याची आवड निर्माण झाल्यानंतर त्याने जिम सुरू केली. पुढे पानिपत येथील शिवाजी स्टेडियमवर तो जाऊ लागला. तिथे काही भालाफेकपटू (Javelin Throw) सराव करत असायचे. त्यांना पाहून नीरज यानेदेखील भालाफेक करायला सुरुवात केली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
सन 2010 ची ही गोष्ट. पानिपतच्या साई सेंटरवर गाजियाबादचा अक्षय चौधरी हा खेळाडू भालाफेक करत. त्यावेळी त्याने तेरा वर्षांच्या नीरजला भाला फेकताना पाहिले. कोणतेही ट्रेनिंग न घेतलेला नीरज 40 मीटर पेक्षा जास्त भाला फेकायचा हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने तिथूनच नीरजला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. इतरही अनुभवी खेळाडूंनी नीरजला चांगला पाठिंबा दिला आणि नीरजने लवकरच जिल्हा पातळीवर मेडल आणून, त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. घरच्यांनी देखील त्याला विरोध न करता कायमस्वरूपी पानिपत येथे पाठवून दिले.
पुढे जाऊन अक्षय चौधरी यांनी त्याला पंचकुला येथे आणले. त्यावेळी नसीम अहमद या प्रशिक्षकांकडून त्याने मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. युट्युबवर चेक रिपब्लिकचे दिग्गज भालाफेकपटू जेन झेलेन्झी यांचे व्हिडिओ पाहत तो शिकत होता. 2012 मध्ये लखनऊ येथे झालेल्या ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने 68.40 मीटर इतका भाला फेकत, नवीन राष्ट्रीय विक्रम बनवत सुवर्णपदक जिंकले. ही त्याच्या कारकिर्दीची सुरुवात होती.
Paris Olympics 2024 मध्ये हे शिलेदार वाढवणार महाराष्ट्राचा मान! मेडलचेही आहेत दावेदार
नीरजच्या यशाचा आलेख चढत होता. 2015 मध्ये त्याने ज्युनिअर गटातील विश्वविक्रमही आपल्या नावे केला. 2015 मध्येच नॅशनल गेम्स स्पर्धेत पाचव्या स्थानी राहिल्यानंतर त्याचा भारतीय पथकात समावेश केला गेला. तो आता पतियाळा येथील सराव करू लागलेला. हा आपल्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट असल्याचे नीरज देखील म्हणतो. 2016 च्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये गोड मिळवल्यानंतर त्याला भारतीय सैन्यात थेट नोकरी देखील मिळाली. याच वर्षी रिओ ऑलिंपिक्सला पात्र ठरण्याची त्याची संधी थोडक्यात हुकली. याच दरम्यान त्याला दुखापत झाल्याने देखील तो काही काळ खेळापासून दूर राहिला.
त्याने यानंतर जबरदस्त पुनरागमन करत 2017 एशियन चॅम्पियनशिप, 2018 एशियन गेम्स आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्स अशा तीनही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल आपल्या नावे केले. जगभरातूनही त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेतली गेली. पुढे 2019 मध्ये त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली. त्यातून तो लवकर सावरला तरी 2020 मध्ये आलेल्या कोरोना साथीत व लॉकडाऊनमध्ये स्पर्धा खेळता आल्या नाहीत. अशा परिस्थितीतही त्याने आपला सराव सुरूच ठेवला.
त्यानंतर 135 कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नीरज 4 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिंपिक्समध्ये उतरला. त्याने 86.65 मीटर भाला फेकत फायनल राऊंडसाठी पात्रता मिळवली. 7 ऑगस्ट रोजी स्पर्धेची फायनल झाली आणि नीरजने इतिहास लिहिला. आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकून त्याने भारताच्या खात्यात ऍथलेटिक्समधील पहिले सुवर्ण टाकले. नीरज मेडल स्वीकारत असताना आणि भारताचा तिरंगा वर जात असताना पाहून, त्यावेळी प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. भारताला त्यांचा गोल्डन बॉय मिळाला होता.
टोकियोतील सर्वोच्च यशानंतरही त्याचा यशाचा रथ थांबला नाही. स्टॉकहोम डायमंड लीग आणि वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्य जिंकली. 2022 एशियन गेम्समध्ये आपले दुसरे सुवर्ण जिंकले. अगदीच त्याचा ताजा फॉर्म इतका जबरदस्त आहे की त्याने 2023 दोहा डायमंड लीग आणि वर्ल्ड ऍथलेटिक्समध्ये टॉप करत सुवर्ण पदके आपल्या नावे केली आहे.
यंदा पॅरिसमध्ये देखील भारताची सर्वात मोठी मेडल होप नीरजच असेल. भारताच्या क्रीडा इतिहासात दोन वैयक्तिक ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्याची नामी संधी त्याच्याकडे असणार आहे. यंदा त्याला ग्रेनाडाचा ऍंडरसन पीटर्स, चेक रिपब्लिकचा जाकुब वाडलेज आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर आव्हान देतील. मात्र, या सर्वात पुन्हा एकदा भारताचा तिरंगा उंच ठेवण्यात नीरज जराही जराशी कमी पडणार नाही, असा विश्वास तमाम भारतीयांना आहे.
(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Neeraj Chopra)
2 comments
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।