Breaking News

T20 World Cup विजयामुळे रोहित-कोहलीला आभाळ ठेंगणं..! कडाडून मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli – Rohit Sharma Hug Viral Video:- भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक विजयाचा दुष्काळ अखेर संपवला. 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. या दिवशी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजयश्री पटाकवली. 2007 नंतर भारताने पहिल्यांदाच टी20 विश्वचषक जिंकला आहे. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या आनंदापुढे आभाळही ठेंगणे झाले. 

भारताने शेवटच्या चेंडूवर चित्तथरारक सामना जिंकला. भारताटच्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 20व्या षटकात 16 धावांची गरज होती. गोलंदाज हार्दिक पांड्याने षटकातील पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवच्या हातून डेविड मिलरची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. मिलर 21 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर कागिसो रबाडाने चौकार ठोकला. परंतु हार्दिकने पाचव्या चेंडूवर रबाडाला सूर्यकुमारकरवी झेलबाद केले. शेवटच्या चेंडूवर एक धाव दिली आणि भारताने 7 धावा शिल्लक असताना अंतिम सामना जिंकला.

या ऐतिहासिक विजयामुळे संघातील स्टार खेळाडू रोहित आणि विराटचे विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण झाले. विराटला त्याच्या कॅप्टन्सीच्या काळात भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकून देता आली नव्हती. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामन्यात 76 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळत त्याने संघाला विश्वविजेता बनवण्यात मोलाचा वाटा दिला. या घवघवीत यशाने विराट आणि रोहितला आनंदाश्रू आवरले नाहीत. सामना विजयानंतर त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. जल्लोष साजरा करुन झाल्यानंतरही ते दोघे पुन्हा एकदा गळाभेट घेताना दिसले.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण अनेकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून रोहित – विराटच्या गळाभेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *