Team India New Head Coach| जुलै महिन्यात भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आगामी टी20 विश्वचषकानंतर समाप्त होत आहे. त्यानंतर पुढील जवळपास साडेतीन वर्षासाठी बीसीसीआय (BCCI) नवा मुख्य प्रशिक्षक शोधतेय. अशात आता बीसीसीआयकडूनच चार नावांचा आग्रह धरला जात असल्याची बातमी समोर येत आहे.
मागील जवळपास चार वर्षांपासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले राहुल द्रविड जून महिन्याच्या अखेरीस आपल्या पदावरून बाजूला होत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक पदासाठी जाहिरात काढली आहे. अनेक माजी खेळाडूंनी या पदासाठी अर्ज घेतल्याचे तसेच आपण इच्छुक असल्याचे सांगितले. मात्र, भारतासारख्या मोठ्या संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी तितकाच मातब्बर प्रशिक्षक असावा असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. त्यामुळे जगभरात आपल्या प्रशिक्षणाचा डंका वाजवलेल्या दिग्गजांना बीसीसीआय स्वतःहून याबाबत विचारणा करतेय.
बीसीसीआयच्या या यादीमध्ये सर्वात वरचे नाव भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याचे आहे. सध्या गंभीर आयपीएलमध्ये केकेआर संघाचा मेंटर असून संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. तो भारतीय असल्यामुळे बीसीसीआय त्याच्याकडे सर्वात पहिली पसंती म्हणून पाहतेय.
गंभीरनंतर बीसीसीआयची पसंती न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग हा आहे. फ्लेमिंग मागील सोळा वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य प्रशिक्षक असून त्याने चेन्नईला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे. फ्लेमिंग भारतीय संघाचा प्रशिक्षक असावा यासाठी एमएस धोनी याला मध्यस्थी घेण्याचा प्रयत्न देखील बीसीसीआय करतेय.
यासोबतच ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक व सध्या आयपीएलमध्ये लखनऊ संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या जस्टिन लँगर यांच्या नावाचा देखील विचार सुरू आहे. त्याने स्वतःहून आपण या पदासाठी इच्छुक असल्याचे म्हटलेले. तर श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज माहेला जयवर्धने याला देखील भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी विचारणा झाल्याचे सांगितले जातेय.
(Team India New Head Coach: BCCI Want Gambhir Fleming Langer Jayawardene There)