
Top Five OCI Footballers: सध्या भारतीय फुटबॉल वादग्रस्त कारणांसाठी चर्चेत आहे. दुबळ्या हॉंगकॉंगविरूद्ध पराभूत झाल्यानंतर चाहत्यांनी AIFF वर टीकेची झोड उठवलेली. त्यानंतर AIFF अध्यक्ष कल्याण चौबे यांनी शुक्रवारी (13 जून) पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी महासंघाच्या पुढील योजनांविषयी माहिती दिली. यामध्ये परदेशी भारतीय खेळाडूंना (OCI Players) भारतीय संघासाठी खेळवण्याच्या निर्णयावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Kalyan Chaubey on the matter of OCI 🗣️#allindiafootball pic.twitter.com/NSe2CnMnrU
— All India Football (@AllIndiaFtbl) June 13, 2025
Top Five OCI Footballers Who Might Play For India
चौबै यांनी या पत्रकार परिषदेत OCI खेळाडूंबाबत AIFF सकारात्मक असल्याचे म्हटले. तसेच, 33 OCI खेळाडूंशी चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भारत सरकारच्या काही निकषांची पूर्तता झाल्यानंतर, हे खेळाडू भारतात येऊ शकतात असे त्यांनी सांगितले. OCI खेळाडू म्हणजे ज्यांचे पालक भारतात जन्मलेले किंवा भारताचे नागरिक असतात. मात्र, सद्यस्थितीत त्यांचे वास्तव्य किंवा नागरिकता इतर देशांची असते. अशा फुटबॉल खेळाडूंना भारतीय संघात समाविष्ट करावे, अशी मागणी होत होती. भारत सरकारने आपल्या नागरिकता नियमांमध्ये शिथिलता आणल्यास, हे खेळाडू भारतासाठी खेळण्यास उपलब्ध होऊ शकतात. भारतात सध्या एक नागरिकत्व कायदा आहे. ज्यामुळे इतर देशातील नागरिकांना भारतात येऊन स्थायिक होण्यासाठी 5 वर्षाचा कुलिंग ऑफ पिरेड भारतात घालवावा लागतो.
AIFF ने आपण 33 खेळाडूंच्या संपर्कात असल्याचे म्हटले असले तरी, त्यांची नावे जाहीर केली नाहीत. मात्र, आपण जाणून घेऊयात त्यापैकी पाच अव्वल खेळाडू कोण असू शकतात.
1) यान धांडा (Yan Dhanda)- सर्व भारतीय फुटबॉलप्रेमी ज्या खेळाडूची भारतासाठी खेळण्याची सर्वात जास्त वाट पाहत आहेत तो आहे यान धांडा. लिव्हरपूल अकॅडमीचा प्रॉडक्ट असलेला यान स्कॉटलंडच्या हर्ट ऑफ मिडलेथॉन या संघासाठी मिडफिल्डर म्हणून खेळतो. यापूर्वी त्याने इंग्लंडमधील प्रतिष्ठित चॅम्पियनशिप लीगमध्ये स्वॅनसी क्लबसाठी काही सामने खेळले आहेत. सध्या 26 वर्षांचा असलेला यान त्याच्या भारतीय वडिलांमुळे भारतासाठी खेळू शकतो. यापूर्वी त्याने 2023 मध्ये आपण भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आतुर असल्याचे म्हटलेले. भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक असलेल्या मनोलो मार्केझ यांनी देखील यान हा भारतीय संघासाठी खेळायला हवा, अशी इच्छा व्यक्त केलेली.
Top Five OCI Footballers Who Might Play For India
2) त्रिमान रणवीर (Triman Ranvir)- बेल्जियम येथे जन्म झालेला त्रिमान रणवीर हा 20 वर्षीय स्ट्रायकर भारतासाठी खेळण्याकरिता पात्र होऊ शकतो. त्याचे आई-वडील बेंगलोर येथे जन्मलेले असून, बेल्जियममध्ये स्थायिक आहेत. त्रिमान याने वयोगट फुटबॉल एसके केंपलार संघासाठी खेळलेले. त्यानंतर फिनलँडच्या पोरी अकाटेमिया या वरिष्ठ संघासाठी फुटबॉल खेळला आहे. काही काळ भारतात मिनर्वा अकॅडमीसाठीदेखील त्याने आपले योगदान दिले होते. आपल्याला भारतात खूप प्रेम मिळालेले. संधी मिळाल्यास भारतासाठी खेळण्याचा माझा नक्की प्रयत्न राहील, असे त्याने सांगितले होते.
3) डिलान मार्कंडेय (Dilan Markanday)- आणखी एक ब्रिटिश नागरिकत्व असलेला भारतीय वंशाचा फुटबॉलपटू म्हणजे डिलान मार्कंडेय. तो स्कॉटलंडमध्ये पहिल्या दर्जाचा फुटबॉल खेळलेला आहे. तर, इंग्लंडमध्ये दुसऱ्या स्तरापर्यंत त्याने मैदान गाजवलेले दिसते. सध्या तो एएफएल लीग 1 मध्ये लेटन ओरिएंट संघासाठी खेळत आहे. त्याचे भारताशी असलेले संबंध अद्याप सार्वजनिक झालेले नाहीत. मात्र, अनेक सूत्रांच्या माहितीप्रमाणे, तो भारतीय वंशाचा असून, भारतासाठी खेळू शकतो.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
4) ओमीद सिंग (Omid Singh)- ज्या खेळाडूची भारतासाठी खेळण्याची चर्चा 2019 पासून होती तो खेळाडू म्हणजे ओमीद सिंग. इराणच्या टॉप लीगमध्ये 100 पेक्षा जास्त सामन्यांचा अनुभव असलेल्या मिडफिल्डर ओमीद याच्याकडे OCI कार्ड देखील आहे. त्याचे वडील मूळता पंजाबचे असून, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. भारतीय फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी 2019 मध्ये ओमीद याच्याशी संपर्क साधला होता. तेव्हा त्याने इराणीयन नागरिकत्व सोडून भारतासाठी खेळण्याकरिता उत्सुकता दर्शवली होती. सध्या 34 वर्षांचा असलेला ओमीद आपल्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला करून देऊ शकतो.
5) रायन विलियम्स (Ryan Williams)- सध्या आयएसएलमध्ये विदेशी खेळाडू म्हणून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा विंगर रायन विलियम्स हा भारतासाठी खेळण्याकरिता उपलब्ध होईल. त्याची आई भारतीय असल्याने, तो भारतासाठी खेळू शकतो. त्याने यापूर्वीच भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केल्याचे देखील समजते. त्याच्याकडे इंग्लंडमध्ये विविध क्लबसाठी 250 पेक्षा जास्त सामने खेळण्याचा अनुभव आहे. तसेच, त्याने ऑस्ट्रेलियासाठी वयोगट आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावर फुटबॉल खेळलाय. तो स्वतः भारतासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळण्याकरिता जास्त उत्सुक असलेला दिसतो.
या पाच खेळाडूंनी व्यतिरिक्त ब्लॅकबर्न रोव्हर्ससाठी खेळणारा अनुभवी डॅनी बाथ (Danny Batth) हा देखील 2017 पासून भारतासाठी खेळण्याकरिता प्रयत्न करत आहे. इंग्लंडचाच नेतान सानसारा (Netan Sansara), जर्मनीचा युवा मिडफिल्डर हरप्रीत घोत्रा (Harpreet Ghotra) व डच लुसियानो नरसिंह (Luciano Narsingh) ते देखील भारतासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
(Top Five OCI Footballers Who Might Play For India)
हे देखील वाचा: स्पेनचा पाडाव करत पोर्तुगालने जिंकली UEFA Nations League 2025
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।