
Team India New Test Captain: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भारतीय संघ नव्या कसोटी कर्णधाराच्या शोधात असेल. रोहितनंतर कर्णधारपदाचा काटेरी मुकुट कोणाच्या डोक्यावर सजणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
Who Will Team India Next Test Captain
या वर्षाच्या सुरुवातीला संपन्न झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतरच भारतीय संघाचा कसोटी कर्णधार बदलला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडसमिती इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माला कर्णधारपदावर ठेवण्यास उत्सुक नव्हती. याबाबत त्यांनी रोहितशी बोलण्याचे देखील सांगितले जाते. त्यानंतरच रोहितने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे आता इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ पूर्णवेळ नव्या कर्णधारासह उतरेल.
भारतीय संघाचा पुढील कर्णधार होण्यासाठी सर्वात पहिला दावेदार आहे शुबमन गिल (Shubman Gill). गिल हा सध्या भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार आहे. तसेच संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे गिल याच्या नावासाठी आग्रही असल्याचे समजते. गिल याला आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपदाचा फारसा अनुभव नसला तरी, तो संघाचा नियमित सदस्य आहे. तसेच, आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स उत्कृष्ट कामगिरी करताना दिसते. गिल हा सध्या केवळ 25 वर्षांचा असून, त्याच्याकडे नेतृत्व दिल्यास तो मोठ्या काळासाठी भारतीय संघाची धुरा वाहू शकतो.
भारतीय संघाचा कसोटी कर्णधार होण्यासाठी केएल राहुल (KL Rahul) हा देखील प्रबळ दावेदार मानला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दीर्घ अनुभव आणि नजीकच्या काळातील सातत्य पूर्ण कामगिरी या त्याच्या जमेच्या बाजू आहेत. त्याने यापूर्वी देखील भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, कर्णधार म्हणून त्याची कामगिरी संमिश्र राहिली होती. तो सध्या ते 33 वर्षाचा असून, पुढील चार वर्षांसाठी संघ व्यवस्थापन विचार करत असल्यास, त्याच्याकडे हे मानाचे पद दिले जाऊ शकते.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
पुढील कसोटी कर्णधाराच्या यादीत तिसरे नाव यष्टिरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) याचे आहे. अपघातानंतर पंत याने कसोटी संघात पुनरागमन केल्यावर, जबरदस्त कामगिरी केलेली आहे. त्याचा आक्रमक खेळ आणि नेतृत्व करण्याची तशीच निर्भीड वृत्ती त्याला या शर्यतीत पुढे नेऊ शकते. पंत याने विविध स्तरावर कर्णधार म्हणून आपली छाप पाडलेली आहे.
भारताचा पुढील कर्णधार म्हणून एक चकित करणारे नाव अचानक समोर येऊ शकते. ते नाव माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे असेल. विराट अद्याप दोन वर्ष तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची दाट शक्यता आहे. केवळ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025-2027 (WTC 2025-2027) या एकाच सायकलचा विचार केल्यास, अचानकपणे विराटच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाऊ शकते. त्याच्या तुलनेत इतर दावेदारांचे वय व अनुभव कमी असल्याने निवड समिती आणि संघ व्यवस्थापन विराटच्या नावाला दुजोरा देऊ शकतात.
या व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा या यादीत असू शकतो. मात्र, त्याच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी बीसीसीआय त्याला विश्रांती देत असते. त्यामुळे कर्णधारपदाची मोठी जबाबदारी त्याच्याकडे न देता, केवळ गोलंदाज म्हणून त्याच्यातील सर्व कौशल्य वापरण्याचा संघ व्यवस्थापन विचार करू शकते.
(Who Will Team India Next Test Captain)
हे देखील वाचा- Rohit Sharma कसोटी क्रिकेटमधून निवृत्त, IPL 2025 चालू असतानाच मोठा निर्णय
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।