Breaking News

अवघ्या 13 व्या वर्षी आयपीएल खेळणार ‘वंडर बॉय’ Vaibhav Suryavanshi! तब्बल 49 शतके आणि आता करोडपती

Vaibhav Suryavanshi In IPL : आयपीएल 2025 (IPL 2025) साठी होत असलेल्या लिलावात एक ऐतिहासिक घटना पाहायला मिळाली. बिहारचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याच्यावर राजस्थान रॉयल्सने तब्बल एक कोटी दहा लाखांची बोली लावली. तो आयपीएल लिलावात बोली लागलेला सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला.

VAIBHAV SURYAVANSHI
Photo Courtesy: X

India U19 Vaibhav Suryavanshi In IPL 2025

या लिलावासाठी नोंदणी केलेला सर्वात युवा खेळाडू असलेल्या वैभव याला राजस्थानने आपल्या संघात सामील करून घेतले. फक्त 30 लाखांपासून त्याची बोली सुरू झाली होती. दिल्लीने देखील त्याच्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र, राहुल द्रविड यांच्यामुळे तो रॉयल बनला.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युवा कसोटीत त्याने भारत अंडर 19 साठी खेळताना केवळ 58 चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घातली. भारतासाठी हे अंडर 19 स्तरावरील सर्वात वेगवान शतक ठरले. त्याच्यापुढे आता केवळ इंग्लंडचा मोईन अली असून, त्याने 56 चेंडूंमध्ये शतक करण्याचा विश्वविक्रम केला आहे. बाद होण्यापूर्वी वैभव याने 62 चेंडूंमध्ये 14 चौकार व चार षटकारांच्या मदतीने 104 धावा केलेल्या.

बिहारसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणारा वैभव (Vaibhav Suryavanshi Bihar) या वर्षाच्या सुरुवातीलाच चर्चेत आला होता. त्याने मागील रणजी हंगामात केवळ बाराव्या वर्षी मुंबईविरुद्ध रणजी पदार्पण केले होते. त्याने सचिन तेंडुलकर व युवराज सिंग यांना याबाबतीत मागे सोडलेले. बिहार संघात निवड होण्यापूर्वी त्याने शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये तब्बल 49 शतके केली होती. त्याने मागील हंगामात बिहारसाठी दोन प्रथमश्रेणी सामने खेळले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या वैभवला भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जाते. त्याने वयाच्या नवव्या वर्षी आपले वडील संजीव यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेण्यास सुरुवात केली. त्याने यापूर्वी देखील बांगलादेश अंडर 19 संघाविरुद्धच्या चौकोनी मालिकेत भारत ब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यामध्ये त्याच्या बॅटमधून 177 धावा आलेल्या. तसेच विनू मंकड ट्रॉफीमध्ये त्याने 78 पेक्षा जास्तच्या सरासरीने 393 धावा काढलेल्या. त्याच्या फलंदाजीमध्ये पृथ्वी शॉ व शिखर धवन यांची झलक दिसते.

(Who Is 13 Year Old Vaibhav Suryavanshi Who Picked For IPL 2025)

हे देखील वाचा: Dhoni Fan Gaurav: धोनीला भेटायला 1200 किमी आला सायकलने; मात्र MSD ने केले दुर्लक्ष, वाचा धक्कादायक प्रकरण