Breaking News

“प्रसिद्धी आणि सत्तेमुळे Virat Kohli बदलला, पण रोहित अजूनही तसाच”; माजी सहकारी खेळाडूचे मोठे विधान

Amit Mishra Bold Statement About Virat Kohli : विराट कोहली (Virat Kohli) हे केवळ भारतच नव्हे तर क्रिकेटविश्वातील मोठे नाव आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवणाऱ्या विराटचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मात्र प्रसिद्धीचा लखलखाट आणि सत्तेच्या ताकदीमुळे विराट बदललाय, असा खळबळजनक दावा त्याच्याच माजी सहकारी खेळाडूने केला आहे. यावेळी त्याने विराटच्या स्वभावाशी रोहित शर्मा याच्या स्वभावाशीही तुलना केली आहे.

माजी भारतीय फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) याने विराट आणि रोहितच्या स्वभावातील फरक सांगताना मोठे वक्तव्य केले आहे. अमित मिश्राने एकेकाळी विराट आणि रोहितसोबत भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले आहे. आयपीएलमध्येही तो विराटसोबत खेळला आहे. आता ‘शुभंकर मिश्रा’च्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अमित मिश्राने विराटच्या स्वभावाबाबत लक्षवेधी भाष्य केले आहे. विराटमध्ये खूप बदल झाला आहे, तर रोहित शर्मा अजूनही जवळपास तसाच आहे. भारतीय संघात विराटचे मित्रही कमी आहेत, असे अमित मिश्राने म्हटले आहे.

अमित मिश्रा म्हणाला, “प्रत्येकजण इतका प्रामाणिक नसतो. एक क्रिकेटर म्हणून मी विराटचा खूप आदर करतो, पण आम्ही आता पूर्वीसारखे मित्र राहिलो नाही. विराटचे मित्र कमी का आहेत? त्याचा आणि रोहितचा स्वभाव वेगळा आहे. आताही जेव्हा मी रोहितला इतर कोणत्याही कार्यक्रमात भेटतो तेव्हा माझ्या बोलण्याचा तो काय विचार करेल याचा मला विचार करण्याची गरज नाही,” असे तो म्हणाला.

माजी फिरकीपटूला विचारण्यात आले की कोहली बदलला आहे का? याला उत्तर देताना अमित मिश्रा म्हणाला, “विराट खूप बदलला आहे हे माझ्या लक्षात आले आहे. आम्ही बोलणे जवळजवळ बंद केले आहे. जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी आणि सत्ता मिळते, तेव्हा काही लोकांना वाटते की लोक इतर काही हेतूने त्यांच्याकडे येतात.”