
Story Of Kabaddi Coach Manpreet Singh:
“जबतक इस सिल्व्हर मेडल का रंग नही बदलूंगा, तब तक ना यह जोश कम होगा, ना जुनून कम होगा, अगले साल फिर से पुरी कोशिश करूंगा” पीकेएल 10 च्या फायनलमध्ये हरल्यानंतर हरयाणा स्टिलर्सचा कोच असलेल्या मनप्रीतने हॉटेलवर जाताना बसमध्येच पुढच्या वर्षी गोल्ड जिंकायची प्रतिज्ञा केली होती. त्यानंतर आज नऊ महिन्यांनी त्याने ही प्रतिज्ञा पूर्ण करून दाखवली. हरयाणा पीकेएल 11 ची चॅम्पियन बनली. नवख्या पोरांना कोचिंग करत मनप्रीतने अखेर कबड्डीचा गड असलेल्या हरयाणात पहिल्यांदा प्रो कबड्डीची (Pro Kabaddi) ट्रॉफी नेली. मागच्या कित्येक वर्षांपासून स्वतःशीच मनप्रीत लढत असलेल्या, लढाईची यासोबतच समाप्ती झाली.
मनप्रीत सिंग भारताच्या कबड्डी इतिहासातील डेकोरेडेट खेळाडूंपैकी एक. खेळाडू म्हणून करिअर करत असताना तब्बल 12 गोल्ड मेडल त्याने मिळवली. 2006 मध्ये एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेआधी एका दिवसात 10 किलो वजन कमी करण्याची त्याची गोष्ट अजूनही कबड्डीप्रेमी आणि माजी कबड्डीपटू आवर्जून सांगतात. अशा या मनप्रीतने 2010 मध्येच व्यावसायिक कबड्डी बंद केली होती. नोकरी आणि व्यवसाय अशी आयुष्याची सेकंड इनिंग त्याने सुरू केलेली.
शिद्दत, कोशिश, कायनात 🏆#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PKLFinal #HaryanaSteelers pic.twitter.com/5RivPynJF9
— ProKabaddi (@ProKabaddi) December 29, 2024
अशातच 2014 मध्ये प्रो कबड्डीचा उदय झाला. पहिल्या दोन हंगामाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मनप्रीतसोबत खेळलेले अनेक साथीदार या लीगमध्ये आपला जलवा दाखवत होते. अशात मनप्रीतचा मुलगा समप्रीत त्याला म्हणाला,
“राकेश अंकल, अनुप अंकल तिथे खेळतात मग तुम्ही का नाही खेळत?”
एखाद्याने ही गोष्ट हसण्यावारी घेतली असती किंवा काहीतरी कारण देऊन उडवून लावली असती. मात्र, लहानपणापासून लढवय्या वृत्ती असलेल्या मनप्रीतने ही गोष्ट चॅलेंज म्हणून घेतली. कबड्डी सोडून चार-पाच वर्षे झालेली. जास्त काही फिटनेस नव्हता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन 120 पार गेलेल. प्रो कबड्डीत 84 किलो वजनाची मर्यादा होती. मात्र, हार मानेल तो मनप्रीत कसला? अवघ्या पाच महिन्यात तब्बल 47 किलो वजन कमी करायचा भीमपराक्रम त्याने करून दाखवला. आणि गडी उतरला पीकेएल 3 च्या मैदानात. त्याला संधी देणारा संघ होता पटना पायरेट्स.
तरूणतुर्क आणि काही अनुभवी खेळाडूंच्या या मेळ्यात मनप्रीत सुरुवातीपासूनच उठून दिसू लागला. अतिशय संथ पद्धतीची रेड आणि वेगळ्याच लहेज्यात कबड्डी-कबड्डीचा उद्गार त्याला वेगळा बनवत होता. ज्या पटना पायरेट्सचा परदीप नरवाल नावाचा नवखा पोरगा अक्षरशः वाऱ्यासारखा खेळत होता, तिथे कॅप्टन म्हणून मनप्रीत संघाला एकसंध ठेवायच आणि गरज पडेल तिथे उभे राहायचं काम करत होता. हे सगळं इतकं जुळून आलं की, पटनाने त्यावर्षी ट्रॉफी नावे केली. बस, पटनाला ट्रॉफी जिंकून देऊन मनप्रीत पुन्हा एकदा खेळाडू म्हणून कबड्डीपासून बाजूला झाला.
मनप्रीत दीड वर्षानंतर पुन्हा एकदा कबड्डीच्या मॅटवर दिसला. यावेळी भूमिका होती कोचची. पीकेएलमध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात फॉर्च्यून जायंट्स संघाने त्याच्यावर जबाबदारी टाकली होती. तिथेच दिसला साऱ्या जगाला खरा मनप्रीत सिंग. एखादा वाघ जंगलात फिरतो तसा त्याचा वावर पूर्ण मॅट आणि डग आऊटमध्ये होता. बेधडक वक्तव्य आणि सामन्यानंतरच्या मुलाखती नव्याने कबड्डी पाहणाऱ्यांना त्याच्या प्रेमात पाडत होत्या. मांडीवर मारलेली थाप आणि मिशांला दिलेला पीळ त्याचा ट्रेडमार्क बनला. लाथ मारील तिथे पाणी काढील, असा स्वभाव असलेल्या मनप्रीतने कोच म्हणून आपल्या पहिल्या दोन सीझनमध्ये गुजरातला फायनलमध्ये नेले. मात्र, दोन्ही वेळी पदरी निराशा पडली. पुढे अनेक वर्ष तो गुजरात सोबतच राहिला. मात्र, पहिल्या दोन सीझनसारखी कामगिरी त्याला आणि संघाला करता आली नाही.
पीकेएल 2022 आधी हरयाणा स्टिलर्सने दिग्गज राकेश कुमार याला पदमुक्त करत मनप्रीतला आपल्या संघाची जबाबदारी दिली. हरयाणाचाच रहिवासी असलेल्या मनप्रीतने हरयाणाला विजेतेपद मिळवून देण्याचा चंगच बांधला. पहिल्या सीजनला यश आले नाही. मात्र, दुसऱ्या सीझनला थेट फायनल आणि तिसऱ्या सिझनला चॅम्पियन, असा चढता आलेख त्याचा राहिला. स्वतः लाच दिलेलं चॅलेंज त्याच पूर्ण झालं. खेळाडू आणि कोच म्हणून पीकेएलची ट्रॉफी जिंकणारा पहिला खेळाडू बनल्यावर त्याचा डोळ्यात तरळलेले अश्रू त्याच्या स्वतःशी झालेल्या या युद्धाची सर्व कहाणी सांगतात.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
खेळाडूंना पोटच्या पोराप्रमाणे माया लावणारा आणि गरज पडेल तेव्हा कडक शब्दात दटवणारा मनप्रीत सगळ्यांचा लाडका झाला. युवा खेळाडूंना मोटीवेट करताना “शेर का बच्चा है तू” असं वाक्य त्याच्या तोंडून ऐकताना त्याच्यातील बापासारखा कोच सगळ्यांना दिसतो. चुकीचा निर्णय दिला आहे असं वाटलं असताना, नियम आणि पेनल्टीची पर्वा न करता थेट अंपायर ना उत्तर मागण्याची हिंमत असो नाहीतर विरोधी संघाच्या कोचला प्रेस कॉन्फरन्समध्ये खरमरीत उत्तरे देऊन दडपणाखाली ठेवण्याची त्याची चालाखी वादादीत आहे.
मनप्रीत किती कुटुंबवत्सल आहे याचे उदाहरण म्हणजे सिझन 11 आधी त्याच्या पत्नीला कोणीतरी सांगितले की, “गोल्ड पहनेगा तभी गोल्ड जितेगा ना” पत्नीने हे सांगितल्यावर, गळ्यात घालायला लगेच सोन्याच्या चेन त्याने बनवून घेतल्या. अखेर योग जुळून आला आणि 8 वर्षांपासून ज्या एका गोल्डसाठी तो तरसला होता ते त्याच्या गळ्यात पडलंच!
(Story Of Kabaddi Coach Manpreet Singh)
हे देखील वाचा- हरयाणा स्टिलर्स PKL 11 ची चॅम्पियन! मराठमोळा शिवम पठारे ठरला फायनलचा ‘मॅचविनर’